स्थैर्य, फलटण दि.१८ : महाराष्ट्र शासनाच्या नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात फलटण शहरासह तालुक्यातील विविध विकासकामांसाठी भरघोस निधीची उपलब्धता करण्यात आली असून तालुक्याच्या विकासासाठी आम्ही सदैवच कटीबद्ध आहोत, असे सांगून फलटण शहरात भुयारी गटार योजनेमुळे खराब झालेल्या रस्त्यांची कामे लवकरच पूर्ण होतील अशी ग्वाही महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.
नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात फलटण शहर व तालुक्यातील विविध विकासकामांसाठी सुमारे २७४ कोटी ९८ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याबाबतची माहिती देण्यासाठी येथील ‘लक्ष्मी – विलास’ या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ना.श्रीमंत रामराजे बोलत होते. यावेळी फलटण – कोरेगांव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण नगरपरिषदेच्या ज्येष्ठ नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक पांडुरंग गुंजवटे यांची उपस्थित होती.
ना.श्रीमंत रामराजे पुढे म्हणाले, फलटण शहरात सध्या भूयारी गटार योजनेचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. हे काम शहराच्या स्वच्छता व आरोग्याच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. हे काम सुरु असताना शहरातील अंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली असली तरी ज्या ठिकाणी भूयारी गटार योजनेचे काम पूर्ण झाले आहे त्या ठिकाणी रस्त्याची कामे सुरु देखील होत आहेत. त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय लवकरच थांबणार आहे.
विरोधक निरा – देवधरच्या पाण्यावरुन अजूनही सर्वसामान्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र; फलटण तालुक्याला निरा देवधरचे पाणी मिळालेच आहे. आणि हे सगळ्या तालुक्याला माहित आहे. त्यामुळे त्यांनी विनाकारण यावर राजकारण करु नये; असेही ना.श्रीमंत रामराजे यांनी यावेळी स्पष्ट केले.
श्रीराम व साखरवाडी हे फलटण तालुक्यातील दोन प्रमुख साखर कारखाने आजमितीस उत्तम पद्धतीने सुरु आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकर्यांचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर सुटलेला आहे. आगामी काळात तालुक्यात कारखानदारी वाढवण्यासाठी लवकरच अॅडिशनल एम.आय.डी.सी. आपण साकारणार आहोत. तसेच उत्तर कोरेगावमध्ये देखील आशियायी महामार्गापासून अवघ्या १० किलोमीटरच्या अंतरावर एम.आय.डी.सी. उभी करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे, ना.श्रीमंत रामराजे यांनी यावेळी सांगितले.
कोरोनाचा प्रार्दुभाव पुन्हा नव्याने वाढण्यास सुरुवात झाली आहे. फलटण तालुक्यातील कोरोना संबंधी लढण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध असून प्रशासन देखील सज्ज आहे. मात्र नागरिकांनी शासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. तरच आपण कोरोनावर मात करु शकतो, त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहनही ना.श्रीमंत रामराजे यांनी यावेळी केले.
आमदार दीपक चव्हाण यांनी फलटण – कोरेगाव विधानसभा मतदार संघात येणार्या कोरेगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये राबवण्यात येणार्या विकास कामांची माहिती यावेळी दिली.