एचएसएनसी समूह विद्यापीठाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन
स्थैर्य, मुंबई, दि. 11 : विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबर कौशल्याधारित शिक्षण आणि प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. यापूर्वी संशोधनाकडे विद्यार्थ्यांचे अधिक लक्ष होते. जागतिकीकरणामुळे संशोधनाबरोबरच कौशल्याधारित शिक्षणाची गरज आहे. राष्ट्रीय उच्च शिक्षण अभियानाच्या (रुसा) माध्यमातून विविध महाविद्यालयांनी एकत्र येऊन समूह विद्यापीठ स्थापन करावे. त्यामुळे नवनवीन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकता येतील. शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी एकत्र येऊन एक मिशन म्हणून पुढाकार घेण्याचे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी एचएसएनसी समूह विद्यापीठाच्या उद्घाटनप्रसंगी केले.
विद्यार्थ्यांचे आनंदाने शिक्षण व्हावे; आपत्कालीन परिस्थितीत परीक्षेपेक्षा शिक्षण सुरु राहिले पाहिजे – मुख्यमंत्री
शिक्षणाचा दर्जा सुधारण्याबरोबरच तंत्रज्ञानाच्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये शिक्षण कसे सुरु राहील यासाठी विविध माध्यमांचा उपयोग करुन परीक्षा कधी सुरु होणार यापेक्षा शिक्षण कसे सुरु राहील याकडे सर्वानी अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणानंतर आनंद मिळतोच पण ते शिक्षण घेताना अधिक आनंदी राहून ते कसे यशस्वी होतील याकडे महाविद्यालयांनी लक्ष द्यावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एचएसएनसी समूह विद्यापीठाच्या उद्घाटन प्रसंगी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले, शिक्षण हे जीवनावश्यक असल्याने चौकटबद्ध शिक्षणापेक्षा आनंदाने जगण्याची कला शिकविणारे शिक्षण असले पाहिजे. या समूह विद्यापीठामुळे शैक्षणिक दर्जा उंचावण्याबरोबरच नवनवीन अभ्यासक्रमाचे स्वातंत्र्य मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनासुद्धा कला, संगीत, आरोग्य, कृषी, क्रीडा आशा विविघ विषयात कोणत्याही वयात शिक्षण घेता येईल आणि विद्यार्थी आपली कला जोपासतील. मीसुद्धा कला शाखेचा विद्यार्थी आहे. मी मुख्यमंत्री झालो नसतो तर चांगला कलाकार झालो असतो. असे सांगून मला अजूनही शिक्षण घेण्यास आवडेल, असेही मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले.
शिक्षित, सुशिक्षित आणि सुसंस्कृत असे देशाचे भवितव्य घडविणारे शिल्पकार आपण तयार करत आहात. जागतिकीकरणामध्ये शिक्षण क्षेत्रात बदल होत आहेत. मात्र शिक्षणाची भूक मात्र तीच कायम आहे. त्यासाठी दर्जेदार गुणवत्तापूर्ण सहज सोपे विद्यार्थ्यांना आनंद देणारे शिक्षण दिले पाहिजे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण सुरु झाले आहे. याचा फायदा आपत्कालीन परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना होत आहे. या विद्यापीठामुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही वयात शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करता येतील.
दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एचएसएनसी समूह विद्यापीठाच्या वेबसाईटचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले.
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले, महानगराबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी समूह विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनासुद्धा कौशल्यावर आधारित शिक्षण घेता येईल. शिक्षण क्षेत्रात गुणवत्तेबरोबरच दर्जेदार शिक्षणासाठी शासन प्रयत्न करत आहेत. व्हर्टिकल युनिव्हर्सिटीसाठीसुद्धा शासनाने समिती गठित केली आहे.
यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, एचएसएनसी समूह विद्यापीठाचे प्रमुख निरंजन हिरानंदनी, महाविद्यालयांचे प्राध्यापक सहभागी होते.