कर्नाळा नागरी सहकारी बॅंकेच्या ३ हजार ठेवीदारांना ६३.५२ कोटी रुपयांचे वाटप – सहकारमंत्री बाळासाहेब पाटील


दैनिक स्थैर्य । दि.२४ मार्च २०२२ । मुंबई । कर्नाळा नागरी सहकारी बॅंकेच्या ठेवीदारांच्या ५ लाखांपर्यंतच्या ठेवी देण्यासाठी डीआयसीजीकडून ३७४.०५ कोटी रुपयांची रक्कम बॅंकेस प्राप्त झाली असून या रकमेचे ठेवीदारांना वाटप सुरु करण्यात आले आहे. १० मार्चपर्यंत ३ हजार ६५ ठेवीदारांना ६३.५२ कोटींचे वाटप करण्यात आले आहे, उर्वरित वाटपाचे काम बॅंकेच्या स्तरावर सुरु असल्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य प्रशांत ठाकूर व अन्य सदस्यांनी विचारलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सहकारमंत्री श्री. पाटील म्हणाले की, रिझर्व्ह बॅंकेने केलेल्या तपासणीत कर्नाळा नागरी सहकारी बॅंकेत आर्थिक अनियमितता आढळून आली, त्यानंतर बॅंकेवर आर्थिक निर्बंध आणले. बॅंकेच्या अर्थिक नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्यासाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे यांची नियुक्ती केली, त्यांनी एकूण २० दोषी व्यक्तींविरुद्ध ५२९.३६ कोटी रुपये रकमेचे दोषारोपपत्र बजावले असून २० दोषींपैकी विवेकानंद पाटील आणि अभिजित पाटील या दोघांच्या मालकीच्या ७० मालमत्ता जप्तीचे आदेश काढले आहेत. बॅंकेमार्फत कर्जवसुलीची कार्यवाही सुरु असून बोगस कर्ज घेतलेल्यांची चौकशी करण्यात येणार असल्याचे सहकारमंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!