स्थैर्य, मुंबई, दि. 22 : बाबा सगळीकडे महामारी पसरलीय माणसं पटापटा मरतायत. द्वारकामाईत जमलेले गावकरी घायकुतीला येऊन साईबाबांना सांगत होते.अल्ला मलिक…आभाळाकडे दोन्ही हात उंचावत बाबा म्हणाले जवळचं जात घेतलं. त्यात पोत्यातील गहू भरडुन काढले आलेलं पीठ शिर्डीत पसरलेल्या महामारीला रोखण्यासाठी शिर्डीच्या पंचक्रोशी बाहेर पसरवून टाकण्यास सांगितले.
कुणीही गावा बाहेर काय घरा बाहेर पडू नका असा फतवा काढला. बाहेरील पाहुण्यांना गाव बंदी केली…त्यावेळचा लॉकडाऊन म्हणा ना…लोकांनी बाबांच्या सुचनेच तंतोतंत पालन केलं…काही दिवसातच शिर्डीची महामारी आटोक्यात आली…संपली…शिर्डीवरील संकट टळलं… कुणी माना अथवा मानू नका आम्हा त्याचे काय…आणि भगवंताची सारी लेकरे…एक पिता एक माय…मुलुंड मधील दिवंगत साई भक्त गव्हाणकारांचा मला फोन आला…संदीप तुमचे लगे राहो राजा भाई हे नाटक शिर्डीला करायचे आहे…भरत दाभोळकर यांचे स्क्रिप्ट…संतोष पवार समीर चौगुले किशोरी आंबीये आनंदा कारेकर प्रणव रावराणे जयवंत भालेकर अशी तगडी कास्टिंग असलेले लोकनाट्य लगे रहो राजभाई…याची निर्मिती माझी बहिण सौ ललित संतोष पोवळे हिची होती…नाटक ठरले…शिर्डीस ज्याचे लागतील पाय…टळतील अपाय सर्व त्याचे…या शिर्डीत आणि प्रत्यक्ष साईबाबांच्या दरबारात आम्हाला प्रयोग करण्याची संधी मिळाली…म्हणून आम्ही सगळे खूष झालो…त्या प्रयोगाच्या दरम्यान शिर्डीतील साईप्रसाद जोरी या युवकाने समनव्ययकाची भूमिका निभावली…आमची उठबस साईबाबांचे दर्शन ते प्रयोगाला लागणारी व्यवस्था…सगळी कामगिरी त्याने चोख निभावली…या घटनेला दहा बारा वर्षे झाली…पण साईप्रसाद बरोबरची मैत्री आजही कायम आहे…कोण कुठला साईप्रसाद ना माझ्या नात्याचा ना गोत्याचा ना गावचा…मी मुंबईत तो शिर्डीत…माझ्याकडून त्याला काहीही फायदा नाही…उलट मीच त्याला कधी शिर्डीला गेलो की दर्शनासाठी घेऊन जाण्यास भाग पाडतो…आम्ही वारंवार भेटतही नाही बोलत ही नाही…त्यानंतर तीन चार वेळा शिर्डीत प्रयोग करण्याची वेळ आली तेव्हां त्याला आवर्जून भेटलो इतकंच…तरीही साईसंस्थानमध्ये कार्यरत असलेला साईप्रसाद मला कित्येक वर्षे ऊन असो पाऊस असो की आत्ताचा लॉकडाऊन…दर गुरुवारी साईबाबांच्या गुरुवारच्या आरतीचे फोटो पाठवतो… धन्य तो साईप्रसाद आणि धन्य त्याची मैत्री…आजही सकाळीच त्याने पाठवलेले फोटो आले…अशा साईप्रसादांमुळेच लॉकडाऊन सुसह्य होतो…जगण्याची नवी उर्मी मिळते.
साईंचा झाला प्रसाद आम्ही गातो त्याचे पडसाद बाबांचा झाला प्रसाद आम्ही गातो त्याचे पडसाद सप्तसुरातुनी सप्तऋषीचे घ्या हो आशीर्वाद आम्ही गातो त्याचे पडसाद.
संदीप शशिकांत विचारे