दैनिक स्थैर्य । दि.१० मे २०२२ । सातारा । जिल्ह्यात उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्तीच्या निवारणासाठी तिच्या व्यवस्थापनासाठी सर्वच यंत्रणांनी आपापसात समन्वय ठेवत सज्ज रहावे. तसेच संबंधित विभागानी आपत्ती नियंत्रण कक्ष 1 जून पासून कार्यान्वीत करावा, अशा सूचना प्र. जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख यांनी केल्या.
नैसर्गिक आपत्ती बाबत मान्सूनपूर्व तयारीची आढावा बैठक प्र. जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये आज संपन्न झाली. यावेळी त्या बोलत होत्य. या बैठकीला प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा देसाई, पोलीस उपअधिक्षक (गृह) सजन हंकारे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाणे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांवरील खड्डे बुजवून घ्यावे तसेच पावसाळ्यात दूषीत पाण्याचा पुरवठा होणार नाही याची खबरदारी घ्यावी. पुलांचे स्टक्चरल ऑडिट करुन पुलांची तातडीने दुरुस्ती करा. संभाव्य दरडप्रवण ठिकाणी आवश्यक साधन सामग्री उपलब्ध ठेवावी. प्रत्येक विभागाने नोडल ऑफीसरची नियुक्ती करुन अधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक, नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांकांची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला द्यावी. ज्या गावांचा संपर्क पावसाळयात तुटतो अशा गावांसाठी पुरेशा जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा अधिच करावा. नगरपालिका, ग्रामपंचायत हद्दीतील नालासफाई, गटारी यांची साफसफाई करुन घ्यावी. आरोग्य विभागाने आवश्यक तो औषधसाठा उपलब्ध ठेवावा. रुग्णवाहिका यंत्रणा सज्ज ठेवावी. त्याचबरोबर वीजवाहक तारांना अडथळा निर्माण करणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडाव्यात. पावसाळ्यापूर्वी आपत्ती विषयक उपलब्ध साधन सामुग्रीची तपासणी करुन घ्या. नदी काटी अतिक्रमण केलेल्या कुटुंबाला मान्सूनपूर्वी नोटीस देवून सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. तसेच तालुका व गावपातळीवर 20 मेपर्यंत मान्सूनपूर्वतयारीबाबत आढावा बैठक घ्यावी, अशा सूचनाही प्र. जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख यांनी शेवटी केल्या.