दैनिक स्थैर्य | दि. 08 जानेवारी 2023 | फलटण | फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित विद्यानगर येथील श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक विद्यामंदिर या प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. अष्टपैलू विद्यार्थी घडविण्यासाठी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलना सारखे सहशालेय उपक्रम नितांत गरजेचे असतात असे कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा फलटण एज्युकेशन सोसायटीचे सदस्य चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
या कार्यक्रमा वेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याते डॉ. सतीश बबनराव फरांदे हे उपस्थित होते. प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबतीत त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच मी देखील या प्रशालेचा माजी पालक आहे. पालकांचे सहकार्य तर उत्तमच असते परंतु शिक्षक व विद्यार्थीही कोठे कमी पडत नाहीत; असे गौरवोद्ग्गारही काढले.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. जाधव यांनी पी.पी.टी वाचनाद्वारे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शाळेमध्ये राबवले जाणारे वर्षभरातील सर्व उल्लेखनीय उपक्रमांचे वाचन केले.
मान्यवरांच्या शुभहस्ते शाळेतील उपक्रमांच्या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना देखील गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे प्रशालेतील माजी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ होय. स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्रशालेतील ज्या माजी विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून शासकीय सेवेचे व्रत हाती घेतले अशा विद्यार्थ्यांना देखील यावेळी गौरविण्यात आले. बालकलाकारांनी मोठ्या उत्साहात व जल्लोषात आपला कलाप्रदर्शनाचा कार्यक्रम सादर केला. यावेळी बहुसंख्येने उपस्थित पालक वर्ग व इतर श्रोत्यांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा उत्साहवर्धक होता.