दैनिक स्थैर्य । दि.०३ फेब्रुवारी २०२२ । फलटण । फलटण तालुक्यामध्ये राजे गटाच्या माध्यमातून गेल्या २५/३० वर्षात विकास कामाचा डोंगर उभा करताना वाढत्या लोकवस्तीच्या प्रमाणात नागरी सुविधांचा विस्तार करण्याबरोबर कृषी, औद्योगिक, शैक्षणिक, व्यापार व सहकार क्षेत्रातील विकास गतीमान करण्यात महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली राजे गट यशस्वी झाल्याचे पंचायत समिती सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
पवारवाडी (आसू) गावातील विविध मंजूर रस्त्यांची भूमीपूजने व कामाचा शुभारंभ सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात आला, त्यानंतर आयोजित सभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी सातारा जिल्हा परिषद सदस्य विश्वासदादा गावडे, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक शिवाजी अण्णा पवार, श्रीराम बझारचे चेअरमन जितेंद्र महादेव पवार, पवारवाडीच्या सरपंच सौ. जयश्री गावडे, उपसरपंच सौ. विद्या वरे, ग्रामपंचायत सदस्य सौ. निर्मला गायकवाड, राहुल परकाळे, किशोर भोसले, सुहास पवार, विकास वरे, प्रदीप वरे, युवराज वरे, दत्तात्रय गावडे, संजय परकाळे, संजय वरे, संपत पवार, योगेश जाधव, तुळशीराम शिंदे, रमेश पवार, आकाश भोसले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
अथक प्रयत्नातून धोम – बलकवडी व नीरा – देवघर पाटबंधारे प्रकल्प मार्गी लागल्याने फलटण तालुका १०० टक्के बागायत झाला असल्याचे नमूद करीत श्रीमंत रामराजे, आ. दिपक चव्हाण, श्रीमंत संजीवराजे व श्रीमंत रघुनाथराजे यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असताना गेल्या २५/३० वर्षात फलटण तालुक्याचा सर्वांगीण विकास साधण्यात आल्याचे प्रतिपादन फलटण पंचायत समितीचे सभापती श्रीमंत विश्वजीतराजे ना. निंबाळकर यांनी केले.
पंचायत समितीच्या माध्यमातून येणाऱ्या विविध योजना सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचविण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहणार असून या योजनांपासून कोणीही गरीब शेतकरी किंवा अन्य पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही याची ग्वाही यावेळी श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.