नीरा खोऱ्यातील सर्व धरणे शंभर टक्के भरली; नदीपात्रात विसर्ग सुरू


स्थैर्य, फलटण, दि. २ ऑक्टोबर : फलटण तालुक्यासाठी वरदायिनी ठरणाऱ्या नीरा खोऱ्यातील भाटघर, वीर, निरा देवघर आणि गुंजवणी ही चारही प्रमुख धरणे शंभर टक्के भरली आहेत. पाटबंधारे विभागाच्या नीरा उजवा कालवा विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गुरुवारी सकाळी सर्व धरणांमध्ये मिळून ४८.३३ टीएमसी म्हणजेच उपयुक्त पाणीसाठ्याच्या शंभर टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

विभागाच्या अहवालानुसार, खोऱ्यातील सर्वात मोठे असलेले भाटघर धरण २३.५० टीएमसी क्षमतेसह पूर्ण भरले आहे. त्याचबरोबर निरा देवघर (११.७३ टीएमसी), वीर (९.४१ टीएमसी) आणि गुंजवणी (३.६९ टीएमसी) ही धरणेही त्यांच्या पूर्ण क्षमतेने भरली आहेत. पावसाने आता बहुतांश धरण क्षेत्रात विश्रांती घेतली असून, केवळ गुंजवणी परिसरात गेल्या चोवीस तासांत ६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

धरणे पूर्ण भरल्याने नदीपात्रात आणि कालव्यांद्वारे पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे. वीर धरणातून नीरा नदीत २५०० क्युसेक्स वेगाने पाणी सोडले जात आहे. याशिवाय, भाटघर धरणातून वीज निर्मितीसाठी १२३६ क्युसेक्स, निरा देवघरमधून ७५० क्युसेक्स आणि गुंजवणीमधून २५० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. समाधानकारक पावसामुळे यंदा पाणीसाठा उत्तम झाल्याने फलटण तालुक्यासह लाभक्षेत्रातील पाण्याची चिंता मिटली आहे.


Back to top button
Don`t copy text!