
दैनिक स्थैर्य । 15 मे 2025। फलटण । महात्मा फुले साहित्य नगरी उत्तरेश्वर हायस्कूल विडणी येथे शुक्रवार दि. 16 रोजी सकाळी 10 वाजता मराठी साहित्य मंडळाच्यावतीने तेरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित केले आहे. संमेलनाचे उद्घाटन पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे सहायक प्रशासकीय अधिकारी, सुरेश बाळासाहेब उचाळे यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ लेखक विश्वास साहेबराव धुमाळ आहेत. मावळत्या संमेलनाध्यक्षा डॉ. निता बोडके, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर उर्फ कवी गोलघुमट विशेष अतिथी उपस्थित राहणार आहे. स्वागताध्यक्ष म्हणून हनमंत अभंग आहेत.
संमेलनास नाशिक येथील ज्येष्ठ कवयित्री ललिता गवांदे, कोल्हापूरच्या रेखा दीक्षित, माजी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ कवी सुरेश लोहार, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. विनायकराव जाधव, अमर घाटगे, विडणीचे सरपंच सागर अभंग भारत देवकांत, अरुण गायकवाड, पोलीस पाटील शीतलताई नेरकर, मुख्याधिपिका शुभांगी शिर्के, प्रगतशील बागायतदार संजय नाळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
साहित्य संमेलनानिमित्त शुक्रवार दि. 16 मे रोजी सकाळी 7 वाजता ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथदिंडी उद्घाटन श्रीराम साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे ज्येष्ठ कवयित्री ललिता गवांदे (नाशिक), ज्येष्ठ कवी सुरेश लोहार, (कराड), ज्येष्ठ कवयित्री मा. रेखा दिक्षीत (कोल्हापूर), मा. अविनाश जगताप (फलटण) हे आहेत. ग्रंथदिंडी उत्तरेश्वर हायस्कूल येथून सकाळी सात वाजता निघणार आहे. ही दिंडी उत्तरेश्वर हायस्कूल, सावतामाळी चौक, बौद्धनगर, क्रांतीवीर उमाजी नाईक चौक व परत उत्तरेश्वर हायस्कूल येथे येईल.
या संमेलनात प्रसार माध्यमे विकली गेली आहेत काय ? या विषयावर परिसंवाद होणार आहे. परिसंवादाचे अध्यक्ष अंबरनाथ हायस्कूलचे मुख्याध्यापक शंकर झाडबुके हे आहेत. यावेळी पत्रकार एल. के. सरतापे व निवेदक सुनील मदने प्रमुख वक्ते आहे.
साहित्यसंमेलनात 38 वे राज्यस्तरीय काव्यसंमेलन होणार आहे. या काव्यसंमेलनात प्रथम नोंदणी झालेल्या 30 कवींना संधी देण्यात येईल. बक्षिसाचे स्वरूप सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व ग्रंथभेट. (प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक व तृतीय क्रमांक आणि उत्तेजनार्थ दोन) असे असेल. स्पर्धेमध्ये सहभागी होणार्या सर्व कवींना सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. कवी संमेलनाध्य एकनाथ देसले आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून तानाजी जगताप आहेत. यावेळी काव्यस्पर्धा प्रमुख राजेश थळकर (महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, अलिबाग रायगड), परीक्षक ज्येष्ठ कवयित्री मा. आशा दळवी (दुधेबावी), परीक्षक ज्येष्ठ कवयित्री सरस्वती भोईटे (फलटण), परीक्षक मा. डॉ सोनवणे महेशकुमार पांडुरंग (मराठी विभाग प्रमुख), काव्य संमेलन निवेदिका डॉ. प्रा. अमृता गोरक्ष वाकचौरे उपस्थित राहणार आहेत.
या संमेलनात विलास माळी, (कवितासंग्रह – झांजरझाप), विनायक पाटील वरळी, (पाणबुडी कुरसुरा व मी), प्रेमशास्त्रीजी महाराज प्रेमनगर (धार्मिक ग्रंथ अध्यात्म विज्ञान), बाबूराव माळी (प्रेरणा), विद्या चौगुले , (ललित लेखसंग्रह- अमीट ठसे), सौ. निर्मला जाधव (ललित लेखसंग्रह स्मृतिमंजुषा), यशवंत घोडे (काव्यसंग्रह भावरंग बाल मनाचे), सुमंगला बाकरे (संत जनाबाई ॥ साहित्य नभांगणातील चमकता तारा), डॉ. शिवाजी बापूराव घुगरड (आत्मकथन- मायंबा ते मुंबई) यांना साहित्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
संमेलनात पूनम जाधव व अविनाश जगताप हे स्वागतगीत सादर करणार आहेत. शुभांगी बोबडे व किरण बोराटे सूत्रसंचालन करणार आहेत. या संमेलनास मान्यवरांनी, पुरस्कार प्राप्त सभासदांनी, निमंत्रित कवींनी, सभागृहामध्ये सकाळी साडे नऊ वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.