दैनिक स्थैर्य । दि. २८ मार्च २०२२ । फलटण । फलटण तालुक्यातील दुधेबावी केंद्रात येणार्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सासकल येथील शाळेच्या चारही खोल्या या धोकादायक असल्याचा सार्वजनिक बांधकाम विभागाने दाखला दिल्याने उर्वरित वर्गामध्ये दोन दोन वर्ग बसत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या रूग्ण संख्येमध्ये घट झाली तरी सुरक्षेच्या दृष्टीने अजुनही काळजी घेणे गरजेचे असतानाही विद्यार्थ्यांना दाटीवाटीने बसावे लागत आहे.कोरोनामुळे बऱ्याच काळ शाळा बंद असल्याने व ऑनलाईन पध्दतीने समाधानकारक अद्याप न झाल्यामुळे दोन वर्ग एकत्र बसल्यामुळे शिक्षकांना अध्यापन करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पालक वर्गामध्ये नाराजीचं वातावरण बनला आहे.
सातारा जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग फलटण चे उपअभियंता यांनी २६/८/२०१९ ला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दक्षिणमुखी असणाऱ्या दगडी इमारतीचे छप्पर हे धोकादायक असल्याचा दाखला दिला आहे. एका बाजूला सत्तारूढ गट व विरोधी गट यामध्ये शाळा व्यवस्थापन समितीच्या निवडीवरून खडाजंगी झालेले असताना या प्रश्नाकडे मात्र सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.ग्रामपंचायत सासकलने सुद्धा याप्रश्नी पाठपुरावा केला नसल्याचे दिसून आले आहे.या प्रश्नी तात्काळ गटविकास अधिकारी सो. पंचायत समिती फलटण व गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती फलटण यांनी लक्ष घालून इमारत दुरुस्तीचे काम मार्गी लावण्याची ग्रामस्थ मागणी करत आहेत.