‘कोरोना गेला !‘ या अविर्भावात आत्ता कुठे सगळ्यांनी वावरायला सुरुवात केली होती. मात्र अचानक दक्षिण अफ्रिेकेतील देशांमध्ये कोरोना विषाणूचे नवीन स्वरुप आढळून आल्याने केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी पुन्हा एकदा धोक्याची घंटा वाजली आहे.
26 नोव्हेंबर रोजी जागतिक आरोग्य संघटनेने ‘ओमिक्रॉन’ या कोरोनाच्या नव्या विषाणूची ‘नोंद घेण्याजोगी प्रजाती’ म्हणून घोषणा केली. याचे कारण म्हणजे, सद्यस्थितीत दक्षिण अफ्रिका व युरोपसह नऊ देशांमध्ये या विषाणूने कोरोना बाधीत रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळू लागले आहेत. हा विषाणू किती वेगाने पसरु शकतो? या विषाणूपासून संरक्षण मिळवण्यासाठी उपलब्ध लसी किती किफायतशीर आहेत? संक्रमीत व्यक्तीला अन्य कोणते शारिरीक त्रास उद्भवू शकतात का? बाधित व्यक्तीच्या जिवाला किती टक्के धोका राहू शकतो? आदी सार्या प्रश्नांची उत्तरे अद्याप तरी प्रश्नचिन्हातच आहेत.
मार्च 2020 मध्ये कोरोनाची पहिली लाट आली. ही लाट ओसरल्यानंतर लोकांना थोडीशी मोकळीक मिळाली. ठप्प झालेले व्यवहार पुन्हा सुरु झाले. मात्र त्यानंतर डेल्टा या कोरोनाच्या नवीन प्रजातीचे संक्रमण अमेरिका, इंग्लंड, युरोपमध्ये सुरु झाले आणि या संक्रमणाविषयी तज्ञांचे अंदाज, सल्ले येईपर्यंत कोरोनाची दुसरी लाट भारतात धडकली. या दुसर्या लाटेत पहिल्या लाटेपेक्षा मोठ्या संख्येने मनुष्यहानी तर झालीच शिवाय आरोग्य यंत्रणाही चांगलीच कोलमडली. त्या लाटेतून कसेबसे सावरुन पुन्हा गाडी रुळावर येत असतानाच आता उद्भवलेल्या या ‘ओमिक्रॉन’ ने सगळ्यांचीच चिंता वाढवली आहे. सद्यस्थितीत भारतात लक्षणीय लसीकरण झाले असले तरी जोपर्यंत भारतात देण्यात आलेल्या कोवीशिल्ड व कोवॅक्सीन या मुख्य लसी सदर विषाणू विरोधात लढण्यासाठी सक्षम असल्याचे स्पष्ट होत नाही तोपर्यंत दक्षता घेणे गरजेचे बनले आहे. त्याकरिता जी गाफिलता दुसर्या लाटेला कारणीभूत ठरली होती त्याची पुनरावृत्ती कशी टाळता येईल याकडे प्राधान्य देणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण देशातील मोठ्या शहरांपासून ते आपल्या छोट्या ग्रामीण भागापर्यंत आज कुठेही पाहिले तरी सोशल डिस्टंसींग, मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर होताना अजिबात दिसत नाही. कुणालाही ‘मास्क आहे कां?’
विचारा, ‘आहे की खिशात; आणि गेला कोरोना आता’ अशी उत्तरे सर्रास आपल्याला मिळतील. बाकी पर्यटन स्थळांवरची गर्दी, तुडूंब भरुन वाहणार्या बाजारपेठा तर कोरोनाचा विसर अगदी ठळकपणे दर्शवत आहेत. खरं तर कोरोना विषाणूचा हा नवीन प्रकार जगात धडकण्यापूर्वी नियमांची पायमल्ली एवढी गंभीर नव्हती. नागरिकही बंधनाला कंटाळले होते. रुग्णसंख्याही घटत असल्याने प्रशासकीय यंत्रणाही नियमांच्या अंमलबजावणीकडे कानाडोळा करीत होत्या. मात्र आता अशी बेफीकीरी वेळीच टाळणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने शासनाने नवीन निर्देशही जाहीर केले आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचा म्हणजे विनामास्क बरोबरच तोंडाला नुसता रुमाल लावून फिरणार्यांवरही दंडात्मक कारवाई करणे. हा आदेश प्रशासनाकडून लवकरात लवकर अंमलात आल्यास निदान मास्कचा वापर तरी नागरिक पुन्हा प्राधान्याने करु लागतील. आपल्याकडे स्वयंशिस्तीचा अभाव असल्याने प्रशासनानेच पुढील संकट टाळण्यासाठी आत्तापासूनच कामाला लागणे आवश्यक असून यामध्ये जिल्हा प्रशासनाने ठिकठिकाणच्या स्थानिक प्रशासनाला जागे करणे आवश्यक आहे.
शेवटचा मुद्दा
शासकीय आकडेवारीनुसार सद्यस्थितीत भारताने 124.10 कोटी मात्रांचा लसीकरणाचा टप्पा पार केला आहे. महामारीच्या आरंभापासून 3 कोटी 40 लाख 28 हजार 506 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 98.36 % झाला आहे. शिवाय दैनंदिन रुग्ण नोंदीचा दर ही गेल्या काही महिन्यांपासून घटत चालला आहे. या सगळ्या जमेच्या बाजू निश्चितच आपल्याकडे आहेत. मात्र असे असले तरी दुसर्या लाटेतील वाईट अनुभवही आपल्या गाठीशी आहेत. आता कोरोनाने नव्या रुपात धोक्याची घंटा वाजवली आहे. आपल्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेला हा ‘ओमिक्रॉन’ किती उपद्रवी आहे? हे काळच सांगेल मात्र त्याचे उपद्रव मुल्य कमी करण्यासाठी आपण आत्तापासूनच जर दक्ष राहिलो तर संभाव्य आरोग्याचे संकट, त्यातून होणारे लॉकडाऊन, मग पुन्हा आर्थिक संकट या सगळ्यालाच निश्चितपणे टाळू शकू, हे लक्षात घ्यावे.
– रोहित वाकडे,
संपादक, सा.लोकजागर.