दैनिक स्थैर्य । दि. १५ ऑक्टोबर २०२२ । फलटण । जनकल्याण समितीच्या फिरती विज्ञान प्रयोगशाळेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आकाशकंदील तयार करण्याच्या कार्यशाळेमध्ये फलटण तालुक्यातील चार जिल्हा परिषद शाळेमधील 200 विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला.
वर्षभर ही फिरती विज्ञान प्रयोगशाळा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 20 शाळांमध्ये विज्ञानाचे प्रयोग मुलांनी स्वतःच्या हाताने करून बघावेत यासाठी घेऊन जात असतेच, आता या सगळ्यासाठी पूर्णवेळ शिक्षकही या उपक्रमात नियुक्त आहेत. पण यासाठी झटणार्या मंडळींच्या डोक्यात यापेक्षा काहीतरी वेगळं करावं असं आलं आणि यातूनच पुढे आली ती आकाशकंदील कार्यशाळेची संकल्पना. आपापल्या व्यवसायातून वेळ काढून या उपक्रमाबद्दल आत्मीयता असलेले कार्यकर्ते पुढे आले, पुरेसं कार्यनुभवाचं साहित्य गोळा झालं, प्रायोगिक तत्वावर 4 शाळांमधून सहकार्यही मिळालं आणि फिरत्या विज्ञान प्रयोगशाळेवर मनापासून प्रेम करणार्या लोकांचा गट शाळांवर पोहोचला देखील.
तुझी डिंकाची बाटली दे झाली असेल तर, माझी कात्री मोठी आहे त्याने पटापट होतंय काम, तुला पिवळे घोटीव कागद मिळालेत की लाल गं?, किती निघाल्या तुमच्या झुरमुळ्या 28 की 30? या आणि अश्या असंख्य वाक्यांच्या सुमारे तास दीड तासाच्या कोलाहलानंतर पाचवी ते सातवीत शिकणारी ती मुलं आपापले रंगीबेरंगी आकाशकंदील उंच धरून उभे होते तेव्हाचा त्यांचा आनंद बघायला आपण स्वतःच या कार्यशाळेत उपस्थित असायला हवं, तो सांगून नक्कीच समजणार नाही. यानंतर यंदाचा आकाशकंदील बाजारातून आणणार का? आणि घरी करणार का? या प्रश्नांना सामूहिक नाही आणि हो ची एकसुरी उत्तरं ऐकायला मिळणं हेच या कार्यशाळेचं उद्दिष्ट असावं.
हा संपूर्ण उपक्रम सुचणे आणि या उपक्रमाचा एक छोटा भाग होण्याची संधी मिळणे याबद्दल जनकल्याण समितीची फिरती विज्ञान प्रयोगशाळा फलटण यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.