प्रकाश आंबेडकरांच्या कृतीवर अजित पवारांची प्रतिक्रिया

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १९ जून २०२३ । मुंबई । राज्यात औरंगजेबाचे पोस्टर झळकावल्यावरून आणि स्टेटस ठेवल्यावरून वाद चिघळला असतानाच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती संभाजीनगर येथील खुलताबाद येथे जाऊन औरंगजेबच्या कबरीवर फुले वाहिली. आंबेडकरांच्या या कृतीमुळे शिवप्रेमी नाराज असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले. तसेच आपण महाराष्ट्रात अनेक वर्षे राहिलो आहोत, महाराष्ट्रातील जनतेच्या मनात याबद्दल काय आहे हे सर्वांना माहिती असल्याचे अजित पवारांनी नमूद केले. ते पत्रकारांशी बोलत होते.

प्रकाश आंबेडकरांनी औरंगजेबच्या कबरीवर वाहिलेल्या फुलांमुळे शिवप्रेमींमध्ये नाराजी असली तर तो प्रत्येकाचा अधिकार आहे. संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिला आहे. औरंगजेबबद्दल आपले मत काय आहे हे सर्वांना माहिती आहे कारण आपण महाराष्ट्रात लहानाचे मोठे झालो आहोत. प्रकाश आंबेडकर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत. बाबासाहेबांनी लिहलेल्या संविधानाने आपल्याला कुठेही जाण्याचा अधिकार दिला आहे. पण ज्यानं त्यानं ठरवायचं आहे की कुठे जायचं”, असेही अजित पवारांनी सांगितले.

भारत राष्ट्र समिती पक्षाच्या सभांबद्दल अजित पवारांनी सांगितले की, वेगवेगळे राजकीय पक्ष देशातील कुठल्याही भागात जाऊन ते आपला पक्ष वाढवू शकतात. चंद्रशेखर राव हे तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत त्यामुळे त्यांना वाटते की महाराष्ट्रात देखील आपला पक्ष वाढवण्यासाठी पाय रोवावेत. या आधी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री असताना मायावती यांनी देखील असा प्रयत्न केला पण त्यावेळी त्यांना फारसे यश आले नाही. मुलायम सिंह यादव देखील मुख्यमंत्री असताना त्यांनीही प्रयत्न केला पण त्यांनाही फारसा प्रतिसाद मिळाला नाही. कदाचित राव यांचा राष्ट्रीय नेता होण्याचा मानस असेल. पण त्यांना वाटते की, आपण एका राज्याचे मुख्यमंत्री आहोत म्हणून दुसऱ्या राज्यांने आम्हाला निवडून द्यावे, पण त्यांच्या पक्षाचे इथे काम कोण पाहणार? असा प्रश्नही अजित पवारांनी विचारला.


Back to top button
Don`t copy text!