स्थैर्य, सातारा, दि.२१: या आठवड्यात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा जिल्ह्यासाठी दोन “गूड न्यूज’ दिल्या. रखडलेल्या कास तलावाच्या कामासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून निधीचा मार्ग मोकळा केला, तसेच साताऱ्याच्या बहुचर्चित मेडिकल कॉलेजसाठी 61 कोटींचा निधी मंजूर केल्याची माहिती दिली. सातारकरांचे दोन महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावले, ही शिवेंद्रसिंहराजे यांची कामगिरी कौतुकास्पद म्हणावी लागेल. सत्ता असो वा नसो मात्र जनतेचे प्रश्न सोडविण्याची बांधिलकी आपल्यात कायम असायला हवी, अशी त्यांच्यातील “तळमळ’ यामागे असावी. कारण विकासकामांसाठी भाजपमध्ये जातोय, असं जाहीरपणे सांगत ते भाजपवासी झाले आणि आता महाविकास आघाडीच्या सरकारकडून ते विकासकामांसाठी पैसे आणत आहेत, हा त्यांच्या “कौशल्याचा’ भाग असावा. असो.
जिल्ह्याचे दोन महत्त्वाचे प्रश्न मार्गी लागत असल्याचे समाधान देणारे हे दोन निर्णय मात्र महाविकास आघाडीच्या विशेषतः राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची घुसमट वाढवणारे ठरले आहेत. “हे चाललंय काय?’ असा भाबडा प्रश्न हे सर्वसामान्य कार्यकर्ते विचारू लागले आहेत. कास तलाव असो किंवा मेडिकल कॉलेज असो, पैसा पुरवत आहे महाविकास आघाडीचे सरकार आणि त्याची घोषणा करत आहेत भाजपचे आमदार. जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे किंवा राष्ट्रवादीचे नेते या दोन्ही कामांविषयी चकार शब्दही काढत नाहीत. राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील नेते त्याबाबत गप्प का? असा प्रश्न सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सतावत आहे. महाविकास आघाडीने मंजूर केलेल्या कामांचे श्रेय “मी करून आणले’ या आवेशात भाजपचे आमदार लाटणार असतील, तर गेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत, तसेच आताच्या विधान परिषदेच्या निवडणुकीतही “आम्ही याचसाठी केला होता का अट्टाहास’ असा सवाल हे कार्यकर्ते विचारत आहेत आणि त्यांच्या या प्रश्नाचे उत्तर महाविकास आघाडीचा जिल्ह्यातला एकही नेता देत नाही. महाविकास आघाडीची फळं अशाप्रकारे दुसऱ्याच्या दारात पडताहेत आणि त्यावर आपला कुठलाही नेता साधं भाष्यही करत नाही, हे या कार्यकर्त्यांचं शल्य आहे.
कास तलावाचा विषय थोडा बाजूला ठेऊ. कारण निदान शिवेंद्रसिंहराजेंनी त्यावर सातत्याने पाठपुरावा तरी केला आहे; पण मेडिकल कॉलेजच्या मंजूर केलेल्या निधीवर तरी आघाडीच्या नेत्यांनी हक्काने बोलायला हवं. थोडा तरी “जश्न’ करायला हवा. मुळात मेडिकल कॉलेजला मंजुरी मिळाली पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना. तत्कालीन पालकमंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी मेडिकल कॉलेजसाठी केलेला पाठपुरावा आणि संघर्षही सर्वश्रुत आहे; पण पुढे विजय शिवतारे यांच्या पालक मंत्रिपदाच्या कार्यकाळात जागेच्या घोळात हा प्रश्न रखडत ठेवला गेला. हेही जनतेला माहीत आहे. आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने त्याला हिरवा कंदील दाखवला; पण त्याची घोषणा करून टाकली ती भाजप आमदारांनी. कार्यकर्त्यांचं म्हणणं एवढंच, की निदान एवढ्या मोठ्या कामाची घोषणा या बैठकीला उपस्थित असलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या पालकमंत्र्यांनी किंवा निदान राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी तरी करायला हवी होती; पण त्यांची चुप्पी का बरे? का असेही काही आहे, की एवढा मोठा निर्णय घेताना उपमुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातल्या इतर नेत्यांना विश्वासातच घेतले नाही? दादांना यामधून नेमकं काय साधायचे आहे? शिवेंद्रसिंहराजेंसारख्या पक्ष सोडलेल्या बड्या नेत्यांना ताकद देऊन “गटबांधणी’ करायची आहे की “पक्षबांधणी’? अशा अनेक प्रश्नांचे जंजाळ कार्यकर्त्यांना सतावत आहे.
दादांच्या मनात काहीही असो; पण सद्यःस्थितीत येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये या साऱ्या प्रकाराचा फार मोठा फटका राष्ट्रवादीला बसू शकतो. नेमक्या ग्रामपंचायती आणि नगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजप आमदाराच्या माध्यमातून या दोन बातम्या आल्यामुळे या निवडणुकांत राष्ट्रवादीचा कार्यकर्ता ढिला पडणार नाही का? राष्ट्रवादी म्हणून ग्रामपंचायत, नगरपालिका निवडणुकांत एरवी इर्ष्येने उभा राहणारा कार्यकर्ता वरचे हे चित्र बघून त्याच्यात किती आत्मविश्वास राहिलेला असेल? उद्या काहीही होणार असेल, तर आपण आता विरोध का घ्यायचा, असा विचार त्याच्या मनात येणार नाही का? भविष्यात शिवेंद्रसिंहराजे यांनी पक्षात प्रवेश केला, तर कदाचित त्याचा पक्षाला फायदा होईलही; पण नाहीच केला, तर दादांच्या या रणनीतीचा फटकाही तेवढाच मोठा असेल… आणि मग उद्याच्या जिल्हा परिषद- पंचायत समित्यांच्या निवडणुकांत आम्ही एवढ्या जागा मिळवल्या, हे सांगताना भाजप नेते दिसले, तर त्यात नवल वाटायला नको. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं खरं शल्य हे आहे. एक तरी नेता त्यावर भाष्य करणार का?