फलटणच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; अजितदादांची ग्वाही


फलटण नगरपरिषदेच्या यशानंतर धीरेंद्रराजे खर्डेकर यांनी घेतली अजितदादांची भेट. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा शब्द.

स्थैर्य, फलटण, दि. २३ डिसेंबर : फलटण शहराच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असून शहरासाठी निधी कधीही कमी पडू देणार नाही, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले. फलटण नगरपरिषद निवडणुकीतील यशानंतर युवा नेते श्रीमंत धीरेंद्रराजे खर्डेकर यांनी पुणे येथे अजितदादांची सदिच्छा भेट घेतली असता त्यांनी ही ग्वाही दिली.

नुकत्याच झालेल्या फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टीच्या महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवले. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुचवलेल्या रणनीतीचा वापर केल्याने हे यश मिळाल्याची माहिती देण्यासाठी धीरेंद्रराजे खर्डेकर यांनी पुण्यात त्यांची भेट घेतली. यावेळी निवडणुकीतील विजयाचा आढावा घेण्यात आला.

आगामी काळात फलटण शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी स्थानिक नेतृत्वाला बळ देण्याचे आश्वासन अजित पवार यांनी दिले. ते म्हणाले,

“शहराच्या विकासासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील आणि राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांच्या पाठीशी मी आणि राज्य सरकार ठामपणे उभे राहू.”

अर्थमंत्री म्हणून बोलताना अजित पवार यांनी स्पष्ट केले की, फलटणमधील विकासकामांसाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल. नवनिर्वाचित सत्ताधाऱ्यांनी शहराच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष द्यावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.


Back to top button
Don`t copy text!