अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍याच्या मदतीला धावला ‘अजिंक्यतारा’

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


एफआरपीनुसार संपुर्ण रक्कम देणारा पहिलाच कारखाना ; १४० रुपयांचा हप्ता बँकेत जमा

स्थैर्य, सातारा, दि. 08 : शेतकर्‍याने पिकवलेल्या ऊसाला उच्चतम दर देतानाच कोरोनासारख्या  महामारीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांच्या मदतीला अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना धावला आहे. कारखाना व्यवस्थापनाच्या काटकसरीच्या, सुयोग्य आर्थिक नियोजनामुळे कारखान्याने गाळपास आलेल्या ऊसाची एफआरपीनुसार सर्व रक्कम अदा केली असून एफआरपीनुसार सर्व रक्कम वेळेत देणारा अजिंक्यतारा कारखाना हा पहिलाच  कारखाना ठरला आहे. दरम्यान, आर्थिक मंदी आणि खरीप हंगामाची सुरुवात अशा कात्रीत सापडलेल्या शेतकर्‍याला अजिंक्यतारा कारखान्यामुळे मोठा दिलासा मिळाला असून कारखान्याने हंमागातील तीसरा (प्रतिटन १४० रुपये) हप्ताही शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा केल्याने शेतकर्‍यांना बी, बियाणे, खते घेण्यासाठी व शेतीशी निडगीत खर्चासाठी मोठा आधार मिळाला आहे.

स्व. भाऊसाहेब महाराजांच्या आदर्श विचारसरणीला अनुसरून ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासद हिताला नेहमीच प्राधान्य देणाऱ्या अजिंक्यतारा कारखान्याने या गळीत हंगामात शासन निर्धारित एफआरपी सूत्रानुसार गाळपासाठी आलेल्या उसाला २७९० रुपये प्रतिटन ऊसदर दिला. कारखान्याने या हंगामात ६१२९१७ मे. टन उसाचे गाळप करून १२.८४ टक्के अशा विक्रमी साखर उताऱ्याने ७७०४५० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. गाळपास आलेल्या उसाला २५०० रुपये प्रतिटन पहिला आणि त्यानंतर १५० रुपये प्रतिटन दुसरा हप्ता वेळेत अदा करण्यात आला. कोरोनाचे संकट सुरु झाल्यापासून कारखान्याने शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्याचे काम केले. आता पावसाळा सुरु झाला असून शेतीची कामे सुरु झाली आहेत. मशागत, बी-बियाणे, खते, औषधे आदी खरेदीसाठी शेतकरी नेहमीच कारखान्याच्या बिलावर अवलंबून असतो. एकीकडे कोरोनाचे संकट आणि त्यामुळे झालेली आर्थिक मंदी या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला अजिंक्यतारा कारखान्याने सावरण्याचे काम केले आहे. शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये, शेतीची कामे खोळंबु नयेत यासाठी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, चेअरमन सर्जेराव सावंत, व्हा. चेअरमन विश्वास शेडगे, कार्यकारी संचालक संजीव देसाई आणि संचालक मंडळाने  योग्य प्रकारे आर्थिक नियोजन करून गाळपास आलेल्या ६१२९१७ मे. टन उसाची एफआरपीतील उर्वरित रक्कम म्हणजेच १४० रुपये प्रतिटन याप्रमाणे एकूण ८ कोटी ५८ लाख ८ हजार ६२१ रुपये रक्कम दि. ८ जून रोजी संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली आहे.

या हंगामाची एफआरपीनुसार होणारी संपूर्ण रक्कम वेळेत अदा करणारा अजिंक्यतारा हा सातारा जिल्ह्यातील पहिला कारखाना ठरला आहे. मागील वर्षीसुद्धा एफआरपीनुसार कारखान्याने संपूर्ण रक्कम वेळेत अदा केली होती. त्यामुळे राज्याच्या साखर आयुक्तांनी लेखी पत्राद्वारे कारखान्याचे कौतुक केले होते. यंदाही कारखान्याने वेळेत संपूर्ण पेमेंट अदा करण्याची परंपरा कायम राखली आहे. या हंगामात कोरोना महामारीमुळे कारखान्यास अनंत अडचणींचा सामना करावा लागला. मात्र संचालक मंडळाने नेटके आर्थिक नियोजन करून कामगारांचा पगार, वाहतूक खर्च, वित्तीय संस्थांचे कर्ज आणि व्याज फेड अशा अनेक आव्हानांना यशस्वीपणे तोंड देत कोणतेही देणे थकीत न ठेवता १०० टक्के एफआरपीची रक्कम ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली आहे.

गाळपास आलेल्या उसाचे पेमेंट एफआरपीच्या कायदेशीर तरतुदीप्रमाणे विहित मुदतीत अदा करून कारखान्याने शेतकऱ्यांच्याप्रती असलेले उत्तरदायित्व कायदेशीररित्या पूर्ण केले, याचे संचालक मंडळास मनस्वी समाधान आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी याप्रसंगी केले.

सभासदांना सवलतीच्या दरात हॅन्ड सॅनिटायझर कारखान्याने सभासद हिताशी कधीही तडजोड केली नाही. कोरोना संकट संपूर्ण जगावर कोसळले. सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले. अशा वेळी हॅन्ड सॅनिटायझरची निर्मिती करून कारखान्याने आरोग्य यंत्रणेच्या कामाला हातभार लावला. कोरोना पासून सभासद शेतकऱ्यांचे रक्षण व्हावे यासाठी कारखान्याने सवलतीच्या दरात हॅन्ड सॅनिटायझर पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. २०० मिली हॅन्ड सॅनिटायझर सभासदांसाठी ३५ रुपये तर विविध संस्था, शाळा, ग्रामपंचायतींसाठी ४५ रुपयांना उपलब्ध करून दिला आहे. याशिवाय ५०० मिलीची बाटली सभासदांसाठी ७० तर इतर संस्थांसाठी ८० रुपये, १ लिटर सभासदांना १२० रुपये तर इतर संस्थांसाठी १५० आणि ५ लिटर सभासदांना ६०० रुपये तर इतर संस्थांसाठी ७२५ रुपयांना उपलब्ध करून दिला आहे. कोरोनापासून स्वतःचे आणि इतरांचे रक्षण करण्यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहन, आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!