दैनिक स्थैर्य । दि.१२ जानेवारी २०२२ । सातारा । अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचा यंदाचा गळीत हंगाम जोमाने सुरू आहे. जिल्हाधिकारी सातारा यांच्या आदेशानुसार व तहसिलदार श्रीमती आशा होळकर यांच्या नेतृत्वाखालील शासकीय भरारी पथकाने मंगळवारी सायंकाळी कारखान्यास अचानक भेट देऊन कारखान्यातील दहा टनी, तीस टनी, चाळीस व साठ टनी ऊस वजन काटयाची तपासणी केली असता ऊस वजन काटे तंतोतंत व अचूक वजन दर्शवित असल्याचा अहवाल भरारी पथकाने दिला असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते यांनी दिली.
तहसीलदार होळकर यांच्या नेतृत्वाखालील भरारी पथकामध्ये बोरगाव पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षक श्रीमती वर्षा सहदेव डाळींबकर, प्रादेशिक सह संचालक (साखर) यांचे प्रतिनिधी लेखापरिक्षक एस.जी.फडतरे, निरीक्षक वैध मापनशास्त्र विभाग,सातारा एस.बी.सावंत, पुरवठा अधिकारी संतोष दळवी, सर्कल विठठल तोरडमल, तलाठी किशोर वाडकर आदींचा समावेश होता. वजन काटे तपासणीदरम्यान शेतकरी प्रतिनिधी म्हणून ओंकार सुरेश कदम, अमर मोरे, विजय पोतेकर, हरी पोतेकर, शेंद्रेचे सरपंच अस्लम मुलाणी हे साक्षीदार म्हणून उपस्थित होते. यावेळी कारखान्याचे शेती अधिकारी विलास पाटील, केनयार्ड सुपरवायझर प्रमोद कुंभार आदी उपस्थित होते.
शासकीय भरारी पथकाने सर्वप्रथम ट्रॅक्टर-ट्रॉली क्र. एमएच-११ यू ८३६२, एमएच-११ ७७७९, एमएच-११ बीए २९१९ व ट्रक क्र. एमएच-४२ बी ७६५९ आदी ऊसाने भरलेल्या वाहनांचे फेरवजन करून ते बरोबर असल्याची खात्री करून घेतली. वजन काटयावर २० किलोची वजने ठेऊन तपासणी केली. तसेच वाहनामधील ऊसाचे वजन इलेक्ट्रॉनिक वे-ब्रीज इंडिकेटरला तंतोतंत असल्याचे दिसून आले व संपूर्ण ऊस वजन काटे अचूक वजन दाखवत असल्याचे सर्वांसमक्ष आढळून आले. यानंतर शासकीय भरारी पथकाने ऊस वजन काटे अचूक असल्याचे “प्रमाणपत्र” कारखान्यास दिले.
कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली कामकाज करीत असलेल्या अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या ऊस वजन काटयाची तपासणी ही शासनाचे वैध मापनशास्त्र, सातारा यांच्यामार्फत दरवर्षी नियमितपणे करून घेतली जाते. ऊस वजन काटे तोतंत वजन दर्शवित असल्याने ऊस वजनाच्या बाबतीत ऊसउत्पादक सभासद, बिगर ऊसउत्पादक सभासद शेतकऱ्यांचा कारखान्यावर पूर्णपणे विश्वास असून अजिंक्यतारा कारखान्याने शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरविला असल्याचे कारखान्याचे चेअरमन सर्जेराव सावंत व व्हाईस चेअरमन विश्वास शेडगे यांनी याप्रसंगी सांगितले.