
स्थैर्य, खंडाळा, दि.१७: खंडाळा तालुक्यातील राजकियदृष्ट्या संवेदनशिल समजल्या जाणार्या अहिरे येथील ग्रामपंचायतीमध्ये होउ घातलेली निवडणुक अस्तित्व आणि प्रतिष्ठेची झाल्याने चुरशीची होणार आहे. दरम्यान गत काहि वर्षात तालुकास्तरिय राजकारणात जात आणि धर्माच्या नावाखाली मांडलेला खेळ विस्कुटुन टाकित डाव साधणार्या आ. मकरंद पाटिल यांची भुमिका निर्णायक ठरणार असल्याने या निवडणुकितील यश- अपयशावर स्थानिक नेतृत्वाचे राजकिय आणि सामाजिक भवितव्य अवलंबुन राहणार आहे.यामुळेच या निवडणुकिकडे संपुर्ण तालुकावासियांचे लक्ष लागुन राहिले आहे.
खंडाळा तालुक्याच्या पूर्व भागात वसलेल्या अहिरे गावची भुमी अहिरेश्वर आणि भैरवनाथाच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे.या मातीत घडलेल्या नेतृत्वाने तालुक्याच्या सामाजिक आणि राजकिय अशा विधायक कार्यास नेहमीच योग्य दिशा दिली म्हणुनच अहिरे गावास अनन्य साधारण महत्व आहे. सर्वसामान्य जनता विकासाच्या केंन्द्र ठिकाणी राहुन विकासपर्व अखंडितपणे सुरु रहावे याच उद्दात हेतुने 1952 साली ग्रामपंचायतीची निर्मिती करण्यात आली. या माध्यमातुन कै. भिवा विठोबा धायगुडे ,कै. खशाबा यशवंत धायगुडे, कै. नारायण मारुती धायगुडे, कै. अविनाश माधवराव धायगुडे – पाटिल, रमेश नारायण धायगुडे यांनी गाव कारभार योग्य रितीने चालवित तालुका आणि जिल्हास्तरीय राजकारणातील आपले स्थान भक्कम केले. तर याच ग्रामपंचायतीचे प्रथम सरपंच होण्याचा बहुमान कै.विठोबा भाउ सोळसकर यांनी मिळवला. तत्कालीन स्थितीत हि लोकशाहि मार्गाने झालेल्या निवडणुकित वैचारिक विरोध असलयाने टोकाचा संघर्ष झाला परंतु विकासपर्व कायम राहिले.याला मोलाची साथ मिळाली कै.मा.आ. माधवराव धायगुडे – पाटिल आणि वंदनाताई धायगुडे – पाटिल यांची. सदयस्थितीत बदलत्या काळाचे अनुकरण करित समाजकारण आणि राजकारणाला चांगलीच गती मिळाली आहे. यामधुनच गत काहि वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत मतभेदाचे रूपांतर मनाभेदा मध्ये झाले आणि राजकिय संघर्ष टोकाला गेला. यामधुन सत्तांतराचा पाठशिवनीचा खेळ सुरु झाला. अशाहि स्थितित कै. अविनाश धायगुडे – पाटिल व रमेश धायगुडे सारखी नेतृत्व जिल्हा आणि तालुक्याच्या राजकारणात भक्कमपणे उभी राहिली. जनहितार्थ विकास कामांचा झेंडा खांद्यावर घेउन वायुवेगाने दौडणारा कै. अविनाश धायगुडे पाटिल हा वारु या स्पर्धेतच शांत झाला. यानंतर हि राजकारणातील वैचारिक विरोध कायम राहिला आणि काहि दिवसातच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सत्तांतर करित त्यांच्या विचारांच्या गटाने विकासपर्व अखंडितपणे सुरु ठेवले. हे विकासपर्व सुरु असताना रमेश धायगुडे यांनी संघटन कौशल्यावर भर देत कार्यकर्त्यांची मोळी घट्ट बांधण्यावर भर दिला यास बहुजन समाजाने मोलाची साथ दिली. यामुळेच 2015 झालेल्या निवडणुकित सत्तांतर करण्यात त्यांना यश मिळाले. यानंतर मिळालेल्या संधीचा फायदा घेत गाव कारभार हाकताना त्यांनी अनेक विकास कामांना प्राधान्य देत विकास रथाचा वेग कायम ठेवला. यामधुनच जनतेला साथीच्या रोगापासुन दुर ठेवण्यासाठी जलशुद्धीकरण पाणी प्रकल्प राबविला. तसेच ग्रामपंचायत कार्यालय अद्यावत करून प्रशासकिय कामाकाजास गती देण्याचा प्रयत्न करण्यात आला. याच बरोबर आवश्यक बाबींची पुर्तता करून अहिरे गामपंचायतीस खडज नामांकन प्राप्त करून गावच्या मानसन्मानात यशाचा तुरा रोवला गेला. याच बरोबर तरुणांसाठी छोटेखानी व्यायाम शाळेची निर्मिती करण्यात आली. गावच्या मुख्य चौकातील परिसर डांबरीकरण व पेव्हरब्लॉक ने सुशोभित करण्यात आला असुन गावातील तीन ठिकाणी अंतर्गत रस्त्याची कामे पुर्ण करण्यात आली आहेत. यासह अन्य विकास कामांना प्राधान्य देण्यात आले असले तरी अनेक कामे आजही प्रलंबित आहेत. यामध्ये रोजच्या व्यवहाराला गती मिळण्यासाठी उपलब्ध असलेल्या बँकेच्या माध्यमातुन एटिम मशीन गरजेचे आहे. यासाठी गामपंचायतीनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. गावातील अनेक ठिकाणी असलेले अंतर्गत रस्ते पक्क्या स्वरुपात निर्मित केले जावेत. गावातील असणारी अंतर्गत गटार योजना भुयारी स्वरूपात राबवुन पुर्णत्वास नेण्यात यावी. वाढते औद्योगिकरण व आधुनिकरण गावची लोकसंख्या वाढत असुन जनतेच्या सोयीसाठी सार्वजनिक विवाह मंगल कार्यालय अथवा बहुउद्देशिय हॉलची उभारणी करण्यात यावी.गावात प्रवेश करताना स्वागत कमानीची उभारणी करण्यात यावी. कायम स्वरूपी पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी पाणी पुरवठा करणार्या दोन विहिरींची निर्मिती करण्यात यावी या सारख्या अन्य गोष्टींचा सामावेश आहे.
गत चार वर्षापुर्वी झालेल्या स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकित राजकिय पुलाखालुन मोठया प्रमाणात पाणी वाहिले आहे. त्यामुळे पक्षांतरा सारखी नसलेली किड तालुक्याच्या राजकारणात निर्माण झाली आणि अनेक गावची राजकिय गणित बदलत गेली. यास अहिरे सारखे राजकिय दृष्ट्या संवेदनशिल गाव हि अपवाद राहिले नाहि. माजी सभापती रमेश धायगुडे यांनी आ. मकरंद पाटिल यांच्या पासुन घेतलेली फारकत आणि विद्यमान उपसभापती वंदनाताई धायगुडे – पाटिल यांनी राष्ट्रवादि बरोबर बांधलेले संधान यामुळे येउ घातलेली ग्रामपंचायत निवडणुक प्रतिष्ठा आणि अस्तित्वाची होणार आहे. दोन्ही गटांनी बाजी मारण्यासाठी कंबर कसली आहे. या स्थितित सामाजिक कार्यातुन संघटन कौशल्यावर भर देत विकास कामांना साथ देणार्या उद्योजक नितिन ओहाळ यांची भुमिका किंगमेकर सारखी असणार असुन यामध्ये आ. मकरंद पाटिल यांचा शब्द प्रमाण मानला जाणार आहे. यामुळे हि निवडणुक अतिशय प्रतिष्ठेची आणि लक्षवेधी ठरणार आहे. या निवडणुकित योग्य समन्वय जमेचा ठरणार असुन असे झाले तरच हिलढत दुरंगी होईल अन्यथा तिरंगी लढतीचा सामना तालुका वासियांना पहावयास मिळणार आहे.
अहिरे येथील दोन्ही राजकीय गट तालुका स्तरिय राजकारण आणि समाजकारणात सक्रिय असुन दोन्ही गटांच्या नेतृत्वानी आ. मकरंद पाटिल यांच्यासाठी तत्काकालीन आणि सदय परिस्थितीमधील दिलेल योगदान अविस्मरणीय असे आहे. परंतु बदलत्या स्थितीनुसार कानफुके आ. मकरंद पाटलांचे कान भरून काहिची कित्येक वर्षाची राजकिय कारकिर्द मातीत घालण्याचा कुटिल डाव रचत आहेत. आबा, कर्तृत्वान कार्यकर्ता घडायला वेळ लागतो. त्यामुळ अहिरे ग्रामपंचायतीची निवडणुक तुम्ही गांभिर्याने घेउ नका असाहि सुर निघु लागला आहे.