दैनिक स्थैर्य | दि. ९ ऑगस्ट २०२४ | फलटण |
ऊस पिकातील क्षेत्र वाढत असताना उत्पादन खर्च विचार करता उसाचे एकरी १०० टन उत्पादनाचे लक्ष्य ठेवून सासकल, ता. फलटण येथील शेतकर्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुपर केन नर्सरी तयार केली आहे.
सध्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री पवार-फरांदे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यामध्ये कृषी विभागाचे विविध उपक्रम व मोहीम सुरू आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान शेतकर्यांपर्यंत पोहोचवून उसाच्या उत्पादनामध्ये वाढ करणे हा प्रमुख उद्देश असल्याचे तसेच फलटण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऊस लागवड शेतकरी करत असतात, उसाची सुपर केन नर्सरी तयार करून उसाची रोपाची लागवड करूनच उसाचे पीक घेण्याबाबत आवाहन यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी सुहास रणसिंग यांनी केले आहे.
यावेळी तालुका कृषी अधिकारी फलटण दत्तात्रय गायकवाड यांनी सुपर केन नर्सरीद्वारे उसाची रोपे तयार करून लागवड केल्यामुळे लागवड खर्च, बेण्यावरील खर्च, योग्य रोपे संख्या ठेवणे, सशक्त रोपे तयार होत असल्यामुळे रोग किडीचा प्रादुर्भाव दिसून येत नाही. तसेच उसाची लागवड रोपांद्वारे झाल्यामुळे योग्य रोपे संख्या ठेवता येते, रोपाची जोमदार वाढ व फुटव्यांची संख्या योग्य मिळत असल्यामुळे परिणामी उसाचे उत्पादन वाढण्यास शेतकर्यांना मदत होणार आहे, म्हणून शेतकर्यांनी सुपर केन नर्सरी तयार करून घरच्या घरी कमी खर्चामध्ये उसाची लागवड करावी, असे आवाहन शेतकर्यांना केले आहे.
सासकल गावामध्ये कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली ५ शेतकर्यांनी सुपर केन नर्सरीद्वारे ऊस रोपवाटिका तयार केली आहे. यावेळी प्रगतशील शेतकरी संतोष मुळीक व मच्छिंद्र मुळीक यांच्या सुपर केन नर्सरीला भेट देऊन त्यांनी कृषी विभागाच्या सुपर केन नर्सरी मोहीमेमध्ये सहभागी झाल्याबद्दल कृषि विभागाच्या वतीने अभिनंदन केले.
यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी सुहास रणसिंग, तालुका कृषी अधिकारी फलटण दत्तात्रय गायकवाड, मंडळ कृषी अधिकारी विडणी शहाजी शिंदे, कृषी पर्यवेक्षक विडणी अशोक जगदाळे, कृषी पर्यवेक्षक विडणी अजित सोनवलकर, कृषी सहाय्यक सासकल सचिन जाधव तसेच सासकल पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते.