स्थैर्य, सातारा, दि. 22 : राज्य शासनाच्या वतीने खरीप हंगामाचे पूर्ण नियोजन झालेले आहे. कुठलाही शेतकरी खते आणि बियाणांपासून वंचित राहणार नाही. तसेच कृषी विभागानेही याबाबत सतर्क रहावे. ज्या भागात एखादी चूक आढळून येईल त्या दुकानावर तर कारवाई होईलच परंतु, संबंधित अधिकार्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा राज्याचे कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांनी दिला.
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात कृषी विभागाचा आढावा त्यांनी घेतला. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ना. भुसे म्हणाले, कोरोनाच्या संकट काळात शेतकरीराजाने मोठी कामगिरी बजावली आहे. लॉकडाऊन असताना कोणीही नागरिक अन्नधान्य व भाजीपाल्यापासून वंचित राहिला नाही. त्यामुळे या शेतकरी बांधवाला जेव्हा आपणास देण्याची वेळ येईल तेव्हा त्याच्या घामाचे योग्य मोल दिले पाहिजे. खरीप हंगाम बैठकीच्या अनुषंगाने सर्व जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. त्यानुसार साताराचा आढावा घेतला असून सातार्यातील होणारी लागवड लक्षात घेवून त्यानुसार बियाणे आणि खतांची उपलब्धता करण्यात येणार आहे. खरीप हंगामाचे पूर्ण नियोजन झाले असून कुणीही शेतकरी खते आणि बियाणांपासून वंचित राहणार नाही. प्रत्येक दुकानदाराने दुकानावर जो बोर्ड असतो त्यात ग्राहकाला सूस्पष्ट दिसतील अशा रितीने दुकानात किती माल आहे, त्यांचे दर काय आहेत ते लिहावे. कृषी विभागानेही याबाबत सतर्क रहावे. ज्या भागात एखादी चूक आढळून येईल त्या दुकानावर तर कारवाई होईलच परंतु, संबंधित अधिकार्यावरही कारवाई करण्यात येईल. एखाद्या बियाणांची उगवण क्षमता नसल्यास त्वरित कृषी विभागाशी संपर्क साधावा.
सातारा जिल्ह्यात आतापर्यंत 45 टक्के पेरणी झाल आहे तर 65 टक्के पीक कर्ज वाटप झाले असून 100 टक्क्यांपर्यंत कर्ज वाटप निश्चित करू.
ना. भुसे यांना लॉकडाऊनच्या काळात अनेक शेतकर्यांचा माल विक्री अभावी सडून गेल्याचे सांगितले असता त्यांनी लॉकडाऊनच्या पहिल्या आठवड्यात असे झाल्याचे मान्य केले. मात्र, त्यानंतर जेथून जेथून सुचना आल्या त्याठिकाणी समस्या सोडवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले आहे.
रेशनचे धान्य पळवून नेले असल्याच्या प्रश्नावर ही स्थानिक पातळीवर प्रशासनाने सोडवण्याची बाब आहे. मात्र, ज्या कुणी चुकीचे काम केले आहे त्याच्यावर शासन कडक कारवाई करणार असल्याचे ना. भुसे म्हणाले.
हळद पिक सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. मोठ्या यात्रांमध्ये जो भंडारा मोठ्या प्रमाणावर उधळला जातो, त्यासाठी हळद आवश्यक आहे. मात्र, सध्या भंडार्यामध्ये रासायनिक घटक असून ते आरोग्याला धोकादायक असतात. याबाबत ते रासायिक घटक कमी करून हळदी जास्त वापरावी, जेणेकरून हळदीचा चांगली बाजारपेठ मिळेल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ना. भुसे यांनी उपक्रमशील शेतकर्यांचे आवर्जून कौतूक केले.