दैनिक स्थैर्य । 29 नोव्हेंबर 2024 । फलटण । पाडेगाव ता. खंडाळा येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कृषी महाविद्यालय, फलटणमधील चतुर्थ वर्षातील विद्यार्थी शेतकर्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दाखल झाले आहेत.
दहा आठवडे चालणार्या या कार्यक्रमामध्ये आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची विविध प्रात्यक्षिके शेतकर्यांना दाखवली जाणार आहेत.
पाडेगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयाला कृषी दूतांनी भेट दिली. त्यावेळी सरपंच श्रीमती मंगल माने, उपसरपंच संतोष माने, माजी सरपंच, प्रा.डॉ. गोपीचंद धायगुडे आदींसह सदस्य, चेअरमन व इतर ग्रामस्थ यांनी कृषि दूतांचे रोप देऊन स्वागत केले.
कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रात्यक्षिकांवर आधारित उपक्रम राबविला जातो. या दरम्यान विद्यार्थी प्रत्यक्ष गावामध्ये वास्तव्य करून ग्रामीण भागातील शेतकर्यांना येणार्या अडचणी, त्यांचे जीवनमान, सामाजिक व आर्थिक स्तर, संबंधित गावातील पीक पद्धती अशा विविध गोष्टींचा अभ्यास करणार आहेत. तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती आधारित उद्योग व्यवसाय व इतर हवामानाविषयी जास्तीत जास्त माहिती विविध प्रकल्पाद्वारे कशी संपादित करता येईल, याबाबत कृषी दूत धनंजय इंगोले, राहुल केसकर, रोहन कांबळे, शिवतेज रणवरे, श्रीजीत धुमाळ, आदित्य गोडसे, सौरभ काटकर हे शेतकर्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमामध्ये शेवटच्या चार आठवड्यात कृषीदूत कृषी आधारित उद्योगांमध्ये प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव घेतील. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू.डी. चव्हाण, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे व प्रा. नितिशा पंडित, कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा धालपे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभणार आहे.