दोन वर्षानंतर महाशिवरात्रीला घेता येणार स्वयंभू तीर्थक्षेत्र नागेश्वराचे दर्शन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २८ फेब्रुवारी २०२२ । बामणोली । गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील मंदिरे बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने हळू हळू सर्व मंदिरे खुली करण्यात आली. आता तर कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे कमी झाल्याने काही प्रमाणात नियम शिथिल करण्यात आले आहेत. तर मार्चपासून आणखीन नियम शिथिल कारण्यात येणार आल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमाना दिली आहे. त्यामुळे तब्बल दोन वर्षांनंतर सातारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून येणाऱ्या शिव भक्तांना स्वयंभू नागेश्वराचे दर्शन घेता येणार आहे. १ मार्च रोजी महाशिवरात्री यात्रा साजरी होत असून सातारा जिल्हयासह संपूर्ण महाराष्ट्रातील शिव मंदिरात भाविक दर्शनासाठी रांगा लावत असतात अशाच प्रकारे कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयातून तास ते दीड तासाचा प्रवास करून शिव भक्त मेट इंदवली पायथा या ठिकाणी जातात. त्यानंतर इंदवलीच्या ओढ्यातून पायी चालत जाऊन स्वयंभू तीर्थक्षेत्र नागेश्वर या ठिकाणी पोहचतात. सातारा व रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर असलेले स्वयंभू तीर्थक्षेत्र नागेश्वर हे जागृत देवस्थान असल्याने या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर भाविक सातारा व रत्नागिरी जिल्ह्यातून दर्शनासाठी येत असतात. या देवस्थानाचे वैशिष्ट्य म्हणजे सह्याद्रीच्या डोंगररांगेत हे देवस्थान असून उंच सुळक्याच्या आतून कोरीव गुहा आहे व त्या गुहेमध्ये स्वयंभू शंकराची पिंड आहे. विशेष म्हणजे मेट इंदवली पायथा ते नागेश्वर मंदिर दरम्यान कोठेही पाणी आढळत नाही. मंदिराच्या खालच्या बाजूला एक पाण्याचं तळ आहे. त्याठिकाणी थोडेफार पाणी आहे. मात्र जो या मंदिराचा सुळका आहे तो पाहण्यासारखा आहे व त्यामध्ये कोठेही पाणी साठण्यायोग्य जागा नाही तरी देखील या सुळक्यातून स्वयंभू शिवपिंडीवर बारमाही पाणी थेंब थेंब पडत असते. अशा स्वयंभू नागेश्वराचे दर्शन घेण्याचा योग हा फक्त महाशिवरात्रीला येत असतो. त्यामुळे दोन वर्षानंतर आता या स्वयंभू नागेश्वराचे दर्शन शिवभक्तांना आता घेता येणार आहे. त्यामुळे या ठिकाणी जाणाऱ्या भाविक भक्तांची संख्या लक्षात घेता कोरोनाचे सद्यस्थितीत असणारे सर्व नियम पाळून भैरवनाथ बोट क्लब बामणोली, ब्रविमश्वर महादेव बोट क्लब शेंबडी, केदारेश्वर बोट क्लब मुनावळे या तिन्ही बोट क्लब मधील साधारणपणे दीडशे बोट महाशिवरात्री उत्सवासाठी सज्ज झालेल्या असून सुरक्षिततेची सर्व जबाबदारी या बोट चालकांनी घेतली आहे. बामणोली येथून सकाळी साडे सहा वाजलेपासून ते सकाळी अकरा पर्यंत बोटी सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या सर्व शिवभक्तांनी कोरोना नियमांचे पालन करून बोट चालक यांना सहकार्य करावे. यावर्षी नागेश्वर व वासोटा या दोन्ही ठिकाणी जाता येणार नाही. महाशिवरात्री दिवशी किल्ले वासोटा पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती बामणोली वन्यजीव वनक्षेत्रपाल कार्यालयाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे फक्त नागेश्वर या ठिकाणी देव दर्शनासाठी जाणाऱ्या भाविक भक्तांनी फक्त यावे असे आवाहन करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!