नामांतरावरून नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना डिवचले; म्हणाले, मर्द असाल तर…

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, कणकवली, दि.७ :  औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चांगलाच गाजत आहे. एकीकडे नामांतरासाठी आग्रही असलेल्या शिवसेनेला महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी कडून विरोध होत आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्ष असलेल्या भाजपा आणि मनसेकडून नामांतराच्या मुद्द्यावरून शिवसेनेला सातत्याने डिवचण्याचे काम सुरू आहे. आता या मुद्द्यावरून भाजपा आमदार नितेश राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले आहे. मर्द असाल तर औरंदाबादचे संभाजीनगर असे नामांतर करून दाखवा, असे आव्हान नितेश राणे यांनी दिले आहे

औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून शिवसेनेला लक्ष्य करताना नितेश राणे म्हणाले की, मर्द असाल तर औरंगाबादचं नाव बदलून दाखवा. बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करून दाखवा. नाहीतर तुम्हाला काय सर्टिफिकेट द्यायचं ते आम्ही देऊ. असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.

तसेच शिवसेनेच्या महाविकास आघाडीतील स्थानाबाबतही नितेश राणे यांनी मोठं विधान केलं आहे. महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस काडीचीही किंमत देत नाही, असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे.

दरम्यान, औरंगाबादच्या नामांतरावरून मनसेनेही शिवसेनेला टोला लगावला आहे. जोपर्यंत शिवसेना सत्तेची लाचारी सोडत नाही, तोपर्यंत ती औरंगाबादचं नामांतर करू शकणार नाही, असा टोला मनसेने लगावला आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे नामांतराच्या मुद्द्यावरून शिवसेनेला डिवचताना म्हणाले की, सत्तेची लाचारी सोडल्याशिवाय शिवसेना औरंगाबादचं नामांतर करूच शकत नाही. औरंगाबादचं नामांतर करण्यासाठी शिवसेनेला काँग्रेसची मदत लागेल आणि काँग्रेसचा नामांतराला विरोध आहे. आता राज्य सरकारने विमानतळाला छत्रपती संभाजीराजेंचे नाव देण्याची शिफारस केंद्राकडे केली आहे. मात्र विमानतळाचं नाव कसलं बदलता आधी शहराचं नाव बदलून दाखवा, असे आव्हान संदीप देशपांडे यांनी दिले आहे.


Back to top button
Don`t copy text!