दैनिक स्थैर्य | दि. २ सप्टेंबर २०२३ | श्रीहरिकोटा |
भारतासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. ‘चांद्रयान-३’ च्या यशस्वी मोहिमेनंतर इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेलाय. भारताच्या महत्त्वाकांक्षी ‘आदित्य एल-१’ चं यशस्वी प्रक्षेपण झालंय. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोनं ‘आदित्य एल-१’ मोहीम राबवलीय. ‘आदित्य एल-१’ चं प्रक्षेपण सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी श्रीहरिकोटा येथून झालं. सूर्यावरील घडामोडी, चुंबकीय वादळे यांचा ‘आदित्य एल-१’ अभ्यास करणार आहे. ‘चांद्रयान-३’ मोहीम यशस्वी केल्यानंतर संपूर्ण जगाचं इस्रोच्या ‘आदित्य एल-१’ मोहिमेकडे लक्ष लागलं होतं. आता ‘आदित्य एल-१’ पृथ्वीपासून तब्बल १५ लाख किलोमीटरचा प्रवास करणार आहे.
दरम्यान, फलटण येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुहास निंबाळकर यांची कन्या अनन्या ही आज भारताकडून सूर्याकडे गेलेल्या ‘आदित्य एल १’ च्या इस्त्रो निरीक्षण टीममध्ये काम करत आहे. इस्रोच्या वतीने जे सातत्याने निरीक्षण केले जाते, त्या टीममध्ये फलटणची सुपुत्री असलेली अनन्या सुहास निंबाळकर हिचा सहभाग असल्याने फलटणची आज मान उंचावली आहे.
आज प्रक्षेपित झालेल्या या ‘आदित्य एल १’ याचे निरीक्षण करण्याचे मोठे काम फलटणची सुपुत्री करीत आहे.