
स्थैर्य, डोंबिवली, दि.८: डोंबिवलीमध्ये एकापाठोपाठ दोन मोठ्या नेत्यांनी मनसेची साथ सोडल्यामुळे मोठी पडझड झाली होती. पण आता अखेर सर्व कार्यकर्त्यांनी सावरत मनसेसैनिकांनी एकत्र येत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं आहे.
रविवारी मनसेने कार्यकर्ता मेळावा घेत आपले शक्तीप्रदर्शन करत कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्याचे काम केले. डोंबिवली मधील मनसे शहराध्यक्ष राजेश कदम यांनी शिवसेनेत आणि केडीएमसी गटनेते मंदार हळबे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने मनसे मध्ये खळबळ माजली. त्यामुळे थेट अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदर राजू पाटील यांनी तातडीने हस्तक्षेप करून डॅमेज कंट्रोल करत मनसे माजी नगरसेवक आणि कल्याण-डोंबिवली आक्रमक चेहरा असलेले मनोज घरत यांना डोंबिवली शहराध्यक्ष पद दिले.
मनोज घरत यांनीही कुठेही विलंबन करता त्वरित कार्यकर्त्यांना एकत्रित करत शक्ती प्रदर्शन केले आणि मेळावा घेतला. यावेळी डोंबिवलीमधील तरुण मंडळीनी पक्षप्रवेश सुद्धा केला. शहराध्यक्ष मनोज घरत यांनी पक्ष सोडून गेलेल्यावर सडकून टीका केली आणि कार्यकर्त्यांना ताकद द्यायचा प्रयत्न केला.
घरत यांनी आपल्या भाषणात सांगितले की, ‘एक मोठ्या पट्टीतील आवाज गेला तरी आपल्याला पाच पैशाच्या फरक पडत नाही. आपल्याकडे मोठ्यापट्टीतील आवाज नसला तरी आपल्याकडे इमान आहे आणि तो आपण कोणासाठी विकणार नाही. ही जेवढी लोक गेलेली आहे त्यांनी स्वतःला विकले आहे. तसंच ज्या व्यक्तीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेली 8 वर्षे महापालिकेत गटनेता, विरोधीपक्ष नेत्याचे पद आणि कार्यालय दिले तरी त्याचे पोट भरले नसेल तो व्यक्ती गेलेला हे आपल्यासाठी चांगले आहे’ अशी टीका घरत यांनी शिवसेना-भाजप मध्ये गेलेल्या राजेश कदम आणि मंदार हळबे यांच्यावर नाव न घेता केली आहे.