स्थैर्य, मुंबई, दि.१३: राज्यात अनलॉक 5 सुरू झालेले असले तरी, मुंबई लोकल लवकर सुरु होणार नाही, लोकलची संख्या वाढवण्यावर भर देणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. तसेच, लोकलची संख्या वाढल्यावर त्यात आणखी लोकांना प्रवास करण्याची परवानगी देऊ, मला गर्दी नकोय, मला कोरोनाचा फैलाव नको आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यामुळे, अद्यापही राज्य सरकार अनलॉक करताना, काळजी घेत असल्याचे दिसून येत. आता, राज्य सरकारच्या या संयमी भूमिकेवरुन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारवर टीका केलीय.
केंद्राने परवानगी दिल्यानंतरही राज्य सरकारने अद्याप मंदिरे सुरू केली नाहीत. केंद्राची भूमिका राज्य सरकारविरोधी असल्याचे सांगत, डिसेंबरपूर्वीच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात येईल, असे भाकीत एड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
तसेच, सध्या देशात बिहार विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. सर्वांचे लक्ष या निवडणूक प्रक्रियेकडे आहे. त्यामुळे, महाराष्ट्रात बिहारमधील निवडणुकांनंतर राष्ट्रपती राजवट लागू होईल, असे प्रकाश आंबडेकर यांनी म्हटले.
राज्य सरकारची भूमिका केंद्र सरकारविरोधी आहे. कृषी विधयेक आणि मंदिर उघडण्यासारखे केंद्राचे निर्णय राज्य सरकारने धुडकावले आहेत. राज्यघटनेनुसार राज्याला केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात जाता येत नाही. पण, महाविकास आघाडी सरकार केंद्रविरोधी भूमिका घेत असल्याचे सांगत आंबेडकर यांनी ठाकरे सरकारवर टीका केली.