दैनिक स्थैर्य | दि. ४ सप्टेंबर २०२३ | फलटण |
राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या सराटी (जालना) येथील आंदोलकांवर लाठीचार्ज व गोळीबार केल्याच्या निषेधार्थ ठिकठिकाणी बंद, मूक मोर्चा, चक्काजाम आंदोलने करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर फलटण येथील सामाजिक कार्यकर्त्या अॅड. कांचनकन्होजा खरात यांनी हा राज्यातील आरक्षणाचा तिढा सोडविण्याची मागणी सरकारकडे केली आहे. आपल्या या मागणीचे निवेदन अॅड. खरात यांनी फलटणचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांना दिले आहे.
अॅड. खरात यांनी निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील मराठा, धनगर व मुस्लीम समाजाचा आरक्षणाचा प्रश्न कोणतेही राज्य सरकार ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून सोडवू शकत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने बोलविलेल्या विशेष अधिवेशनात हा आरक्षणाचा तिढा सोडविण्यासाठी आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवरून ७० टक्के करून समाजातील आर्थिक दुर्बल व मागास झालेल्या समाजाला न्याय देण्यासाठी हे आरक्षणाची मर्यादा वाढविणारे विधेयक लोकसभेत मांडावे. तसेच जालन्यातील लाठीचार्ज-गोळीबार घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे.