
दैनिक स्थैर्य । 13 मार्च 2025। फलटण । शासनाच्या निर्णयानुसार श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीला स्थगिती मिळाली असून श्रीराम सहकारी साखर कारखान्यावर प्रशासक बसणार नाही. आत्ता जी बॉडी कार्यरत आहे, तीच बॉडी पुढे सुद्धा कार्यरत राहणार आहे. विरोधकांकडून मुद्दामून दिशाभूल करण्याचे कामकाज सुरू आहे; असे मत श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी व्यक्त केले.
श्रीराम सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक ही येणाऱ्या काही दिवसांमध्ये होऊ घातलेली होती. परंतु सदरील निवडणुकीच्या अनुषंगाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याने शासनाच्या माध्यमातून सदरील निवडणुकीला स्थगिती देण्यात आलेली आहे, याबाबत अधिक माहिती देताना श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे बोलत होते.
यावेळी बोलताना डॉ. शेंडे म्हणाले की, भवानीनगर येथे असणाऱ्या छत्रपती साखर कारखान्याबाबत गत पाच वर्षांपासून निवडणुकीवर स्थगिती आहे. त्या ठिकाणी कोणताही प्रशासक नियुक्त करण्यात आलेला नाही. त्यामुळे श्रीराम सहकारी साखर कारखान्यावर सुद्धा नक्कीच प्रशासक बसणार नसल्याची खात्री आम्हाला आहे.
श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिनांक 25 फेब्रुवारी रोजी कारखान्याच्या सभासदांची मतदार यादी म्हणून मंजुरी घेतलेली होती. त्यामध्ये एकूण सभासद हे तब्बल 14500 आहेत त्यापैकी फक्त 80 सभासदांनी 15000 रुपये असणारी सभासद फी पूर्ण केलेली आहे परंतु निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी 14,500 सभासदांची यादी ही मतदार यादी म्हणून मान्य केलेली आहे, असेही डॉ. शेंडे यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना डॉ. शेंडे म्हणाले की, श्रीराम सहकारी साखर कारखान्यामध्ये वारस नोंदीची जबाबदारी ही संबंधित वारसदाराची असून कारखाना प्रशासन प्रत्येक मयत कुटुंबामध्ये जाऊन वारसाची नोंद करू शकत नाही. कारखान्याच्या माध्यमातून वेळोवेळी याबाबत सर्व सभासदांना व सभासदांच्या वारसांना मयत नोंद करून वारस नोंद करून घेण्याचे आवाहन वेळोवेळी करण्यात आलेले आहे.
यासोबतच कारखान्याच्या होणाऱ्या प्रत्येक वार्षिक सर्वसाधारण बैठकीमध्ये वारस नोंदी बाबत वेळोवेळी आवाहन करण्यात आलेले आहे. त्यासोबतच ज्या सभासदांची सभासद फी ही १५ हजार रुपयांपेक्षा कमी आहेत, त्यांनी सुद्धा सभासद फी 15 हजार रुपये भरून घ्यावी, असे आवाहन सुद्धा कारखान्याच्या माध्यमातून वेळोवेळी करण्यात आलेले आहे, असे सुद्धा डॉ. शेंडे यांनी यावेळी स्पष्ट केले.