
स्थैर्य, फलटण, दि. ३० ऑगस्ट : भारत सरकारच्या जनगणना २०२७ कार्यक्रमाच्या पूर्वतयारीला फलटण तालुक्यात सुरुवात झाली असून, प्रशासकीय पातळीवर कार्यवाहीला वेग आला आहे. जिल्हा जनगणना अधिकाऱ्यांच्या पत्रानुसार, फलटणचे तहसीलदार अभिजित जाधव यांनी तालुक्यातील सर्व ग्राम महसूल अधिकाऱ्यांना जनगणना कामासाठी प्रगणक गट (Enumerator Blocks) तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.
आगामी जनगणनेचे काम अचूक आणि सुरळीतपणे पार पडावे, यासाठी प्रत्येक गावात घरांचे गट तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. साधारणपणे ६५० ते ८०० लोकसंख्येसाठी किंवा १५० ते १८० घरांसाठी एक प्रगणक गट तयार केला जाणार आहे. या गटानुसारच प्रत्यक्ष सर्वेक्षणासाठी मनुष्यबळाची (प्रगणकांची) नेमणूक केली जाईल.
तहसीलदार अभिजित जाधव यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आपापल्या सज्जामधील घरांची विभागणी करून, प्रत्येक गटाचा दिशा दर्शवणारा नकाशा आणि यादी तयार करण्यास सांगितले आहे. ही सर्व माहिती विहित नमुन्यात भरून आज, दि. ३० ऑगस्टपर्यंत तहसील कार्यालयात सादर करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.
तालुका स्तरावरून ही माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवायची असल्याने, या कामात कोणताही विलंब होणार नाही याची दक्षता घेण्यासही सांगण्यात आले आहे. या निर्देशामुळे तालुक्यात जनगणना २०२७ च्या प्रत्यक्ष कामाची पहिली पायरी सुरू झाली आहे.