दैनिक स्थैर्य । दि. ०८ सप्टेंबर २०२२ । फलटण । फलटण तालुक्यात सध्या पावसाने थैमान घातलेले आहे. फलटण शहरातील बाणगंगा नदीसह तालुक्यात असणाऱ्या ओढ्या नाल्यांना मोठ्या प्रमाणावर पूर येत आहेत. त्यामुळे काही काळ काही गावांचा संपर्क तुटत आहे. या सर्व परिस्थितीच्या प्रार्श्वभूमीवर फलटण तालुक्यातील असणाऱ्या सर्व प्रशासकीय यंत्रणांनी समानव्य साधत सतर्क राहावे, असे आवाहन आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.
फलटण येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर निर्देश देत होते. यावेळी आमदार दीपक चव्हाण, प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, मुख्याधिकारी संजय गायकवाड, गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे – पवार, तालुका कृषी अधिकारी सागर डांगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता होसे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
फलटण तालुक्यामध्ये सध्या पावसाने थैमान घातलेले आहे. आगामी काळामध्ये किती दिवस अजून पाऊस पडेल. हे कोणीही सांगू शकणार नाही. त्यामुळे आताच्या पूर परिस्थितीसह पुढील पावसाचा विचार करूनच योग्य त्या उपाययोजना तातडीने कराव्यात. ग्रामीण भागामध्ये तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील व कृषी सहाय्यक यांच्या मार्फत तातडीने अहवाल तयार करून घ्यावेत. यासह सर्व शासकीय अधिकाऱ्यांना आपल्या नियुक्ती ठिकाणी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात यावेत, असेही आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
गेल्या काही दिवसांचा विचार केला तर संध्याकाळीच पावसाला सुरवात होत आहे. ज्या ठिकाणी नुकसान झाले आहे त्या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणेच्या मार्फत तातडीने पंचनामे करण्यात यावेत. पंचनामे करताना सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवत संबंधित नुकसान झालेल्या शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत शासनाच्या माध्यमातून कशी मिळेल, याकडे विशेष लक्ष द्यावे, असेही आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
बाणगंगा धरणाची प्रत्येक्ष पाहणी करून धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची व जाणाऱ्या पातळीची योग्य ती माहिती घ्यावी. बाणगंगा धरण हे बरेच जुने धरण असल्याने त्या ठिकाणी योग्य ती काळजी घेणे गरजेची आहे. गरज पडल्यास त्या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात. बाणगंगा नदी फलटण शहरातून वाहत असल्याने त्याचे पडसात थेट शहरामध्ये तातडीने उमटत असतात. याबाबत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी सुद्धा सतर्क राहून योग्य त्या कार्यवाही करावी, असेही आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी स्पष्ट केली.
फलटण तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये नियुक्त अधिकारी यांनी त्या ठिकाणीच उपस्थित राहावे. त्याबाबत योग्य ते आदेश संबंधित खात्याच्यामाध्यमातून देण्यात यावेत. तालुक्यातील सर्व गावांचा आढावा घेवून प्रत्येक ठिकाणी तातडीने पंचनामे करण्यात यावेत, असे यावेळी आमदार दीपक चव्हाण यांनी स्पष्ट केले.
कोरेगाव तालुक्यात सुद्धा पंचनामे तातडीने करा : श्रीमंत रामराजे
फलटण तालुक्यात ज्या प्रमाणे शासकीय यंत्रणा समन्वय ठेवून काम करीत आहेत. त्याच प्रमाणे कोरेगाव तालुक्यात सुद्धा यंत्रणेने काम करावे. कोरेगाव तालुक्यात ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. अश्या ठिकाणी तातडीने पंचनामे करण्यात यावेत, असे निर्देश आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी कोरेगावच्या प्रांताधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना दूरध्वनीद्वारे यावेळी दिले.