दैनिक स्थैर्य । दि. ०५ डिसेंबर २०२१ । म्हसवड । म्हसवड यात्रा रद्द केल्यामुळे नाथभक्तांनी व म्हसवडकरांनी पुकारलेला बंद अखेर प्रशासनाने नरमाईची भुमिका स्वीकारल्यानंतर मागे घेण्यात आला. रथाला ब्रिकेट वा पत्र्याने न झाकता दर्शनासाठी खुला ठेवणे व रथ नगरप्रदक्षिणे ऐवजी यात्रा पटांगणावर रथप्रदक्षणा करण्यास परवानगी दिली आहे.
याबाबत माहिती अशी, महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्रीसिध्दनाथ माता जोगेश्वरी यांच्या रथोत्सवाला व यात्रेला एक महिन्यांपूर्वी प्रशासनाच्या मागणीनुसार रथाचे मानकरी, मानकरी, ट्रस्ट व नगरपालिकेचे पदाधिकारी यांनी सर्व अटी व हमीपत्र देवून ही प्रांताधिकारी शैलैश सुर्यवंशी यांनी गुरुवारी रात्री अचानक यात्रेसंबधी अधिसूचना काढून यात्रा व रथ प्रदक्षिणा रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले. ही माहिती म्हसवड शहरात कळताच नागरीकात प्रशासनाच्या विरोधात संतापाची लाट उसळून म्हसवड बंदची हाक नाथभक्तांनी दिली. शनिवारी सकाळी 10 वाजता यात्रा पटांगणावर नागरीक एकीकडे तर दुसरीकडे 300 पोलिस बंदोबस्तासाठी ताफा व महसूलचे अधिकारी रथानजिक समोरासमोर आले होते. अधिकारी, पोलिस व म्हसवडचे नागरीक यांच्यात चर्चा होऊन अखेर प्रशासनाने नमती भुमिका व भावनिक विषय लक्षात घेऊन रथाला ब्रिकेट वा पत्र्याने न झाकता दर्शनासाठी खुला ठेवणे व रथ नगरप्रदक्षिणे ऐवजी यात्रा पटांगणावर रथप्रदक्षणा करण्यास परवानगी दिल्याने आजचा बंद व प्रशासनाचा निषेध मोर्चा रद्द करण्यात आला. यामुळे शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तहसीलदार सुर्यकांत येवले, सपोनि बाजीराव ढेकळे, वडूजचे मालोजीराव देशमुख यांनी घेतलेल्या भुमिकेमुळे आंदोलन मागे घेण्यात आले.
येथील ग्रामदैवत व लाखो भाविकांचे कुलदैवत व श्रध्दास्थान असलेले येथील श्री सिध्दनाथ देवी जोगेश्वरी देवस्थानच्या शाही मंगल विवाह सोहळ्याची सांगता सुमारे पाच लाख भाविकांच्या उपस्थित प्रत्येक वर्षी केली जाते. गेल्यावर्षी हि कोव्हीड 19 मुळे यात्रा रद्द करण्यात आली होती. यंदाही यात्रा ओमिक्रोन या विषाणूमुळे प्रशासनाने रद्द् केले होती. मात्र, शुक्रवारी सायंकाळी रथाचे मानकरी तेनसिंग राजेमाने, पृथ्वीराज राजेमाने, कैलास भोरे माजी नगराध्यक्ष विजय धट, सुरेश म्हेत्रे सोमनाथ केले. संजय टाकणे, दत्तात्रय डावकरे, अशोक पिसे, आदी शेकडो नागरीक रस्त्यावर उतरून प्रशासनाच्या निषेधार्थ म्हसवड बंद करण्याची हाक दिली. त्याप्रमाणे आज शनिवारी म्हसवडच्या नागरीकांनी उत्स्फुर्तपणे शहर बंद ठेवून शेकडो नागरी यात्रा पटांगणावर जमा झाले होते तर रथा नजिक पोलिस फौजफाटा, महसूल विभागाचे अधिकारी यांनी यात्रा पटांगणावर छावणीचे रुप आले होते. याठिकाणी तहसीलदार सुर्यकांत येवले, वडूजचे सपोनि मालोजीराव देशमुख, म्हसवडचे सपोनि बाजीराव ढेकळे, दहिवडी सपोनि तासगांव, यांनी म्हसवडच्या नागरीकांशी आंदोलन मागे घेण्यासंबधी चर्चा केली.
यावेळी विजय धट, पृथ्वीराज राजेमाने, तेजसिंह राजेमाने, सोमनाथ केवटे, कैलास भोरे, संतोष पिसे राजू पिसे, सुरेश म्हेत्रे, विनोद रसाळ, चंदू केवटे आदी मानकरी व ग्रामस्थ यांच्याबरोबर चर्चा करुन रथ यात्रा पटांगणावर फिरवून पुन्हा जागेवर आणायचा, दर्शनासाठी रथ खुला ठेवण्याच्या अटीवर आंदोलन मागे घेऊन म्हसवड शहरातील दुकाने उघडूनसर्व व्यवहार सुरु करण्यात आले. प्रशासनाने घेतलेल्या या सामन्यासाठी भुमिकेतमुळे प्रशासन व म्हसवडकर नागरीक यांच्यातील वादावर अखेर पडदा पडल्याने व नागरीकांना दर्शन मिळणार आहे.
म्हसवड शहराला पोलीस छावणीचे स्वरुप-म्हसवड शहरातील सिध्दनाथ यात्रा जरी प्रशासनाने रद्द केली असली तरी म्हसवड शहरात बाहेरुन भाविक येवु नयेत यासाठी पोलिसांनी शहरात येणार्या प्रत्येक रस्त्यावर पोलीस छावणी उभारली आहे, तर शहरातील अंतर्गत रस्तेही बैरी गेट लावुन बंद केली आहेत, शहरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे त्यामुळे शहराला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.