
स्थैर्य, फलटण, दि. 31 ऑगस्ट : यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा, यासाठी फलटण तालुका पंचायत समिती प्रशासनाने कंबर कसली असून, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती यशस्वी नागराजन यांच्या संकल्पनेतून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. या उपक्रमाला तालुक्यातील ग्रामस्थांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
याअंतर्गत, प्रत्येक ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात गावपातळीवरील गणेश मंडळे, सरपंच, ग्रामसेवक, बचत गट, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य कर्मचारी यांच्या समन्वयातून बैठका घेण्यात आल्या आहेत. नैसर्गिक जलस्रोत प्रदूषित होऊ नयेत, यासाठी प्रत्येक गावात गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम पाण्याचे हौद तयार केले जाणार आहेत. तसेच, गावातील पडीक आणि पिण्याच्या पाण्यासाठी वापरात नसलेल्या विहिरींमध्येही विसर्जनाची सोय करण्यात आली आहे.
विसर्जनाच्या ठिकाणी माहिती फलक आणि पोस्टर्स लावून जनजागृती केली जात आहे. याशिवाय, विसर्जनावेळी जमा होणाऱ्या निर्माल्यापासून कंपोस्ट खत निर्मिती करण्यासाठी ग्रामपंचायतींना उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून पर्यावरणाचे संरक्षण करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.