दैनिक स्थैर्य | दि. ११ एप्रिल २०२३ | फलटण |
वाखरी (ता. फलटण) गावच्या गेल्या वर्षीच्या यात्रेवेळी गावातील दोन्ही गटांच्या पोलीस प्रशासन व उपविभागीय अधिकारी, सरपंच, यात्रा कमिटी व ग्रामस्थांबरोबर वारंवार बैठका घेऊनही समझोता झाला नव्हता. त्यानंतरही प्रशासनाने आजपर्यंत या गावातील दोन्ही गटात बैठका घेऊन समझोता करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, हा समझोता न झाल्याने उपविभागीय दंडाधिकारी श्री. शिवाजीराव जगताप यांनी वाखरी गावच्या १२ ते १७ एप्रिलदरम्यान होणार्या यात्रेतील धार्मिक व मनोरंजनाच्या कार्यक्रमांना बंदी घातली आहे. त्यामुळे देवाचा छबिना काढण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच यात्रेतील देवाचा हळदीचा कार्यक्रम व देवाचा लग्नसोहळा या कार्यक्रमास मंदिरातील पुजारी व मानकरी हेच करतील. इतर लोकांना यावेळी मनाई करण्यात आली आहे.
गावातील दोन्ही गटात यात्राकाळात भांडणे होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून उपविभागीय दंडाधिकारी श्री. शिवाजी जगताप यांनी वाखरी गावच्या यात्रेतील धार्मिक व करमणुकीच्या कार्यक्रमांना बंदी घातली आहे. तसा आदेश आज जारी करण्यात आला आहे.