आदित्य ठाकरेंनी दोन शब्दांच्या ट्विटमधून साधला शिंदे गटावर निशाणा, अनेकांच्या कमेंट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २० जून २०२३ । मुंबई । राज्यात गेल्या वर्षी २० जून रोजी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदारांनी उद्धव ठाकरेंविरोधात बंड केले होते. त्यानंतर उद्धव यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार पडले. महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरा देत राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. तर, देवेंद्र फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्री बनले. मात्र, एकनाथ शिंदेंसह वेगळा गट स्थापन केलेल्या आमदारांना विरोधकांनी आणि शिवसेनेनं गद्दार म्हणून हिनवले, तसेच, ५० खोके घेऊन हे सर्वजण गद्दार झाल्याची टीकाही शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आली. आता, पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांनी दोनच शब्दात ट्विट करत शिंदे गटावर निशाणा साधला.

आदित्य ठाकरे यांनी शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्र दौरा करताना शिंदे गटातील नेत्यांवर सडकून टीका केली. यावेळी, त्यांनी शिंदे गटात गेलेल्या शिवसेनेच्या आमदारांना गद्दार म्हणत सातत्याने लक्ष्य केले होते. आजही आदित्य ठाकरेंकडून शिवसेनेतील बंडखोर आमदारांना गद्दार असे संबोधले जाते. त्याचत, २० जून हा दिवस जागतिक गद्दार दिन म्हणून साजरा व्हावा, अशी मागणीच शिवसेनेनं माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. तर, शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने आज आंदोलनाही करण्यात येत आहे. विशेष म्हणजे खासदार संजय राऊत यांनी संयुक्त राष्ट्राला पत्र लिहून २० जून जागतिक गद्दार दिन म्हणून साजरा करण्याची मागणी केली आहे.

२० जून २०२२ रोजी एकनाथ शिंदे यांनी आमच्या पक्षाच्या ४० आमदारांसह भाजपच्या मदतीने आमचा पक्ष सोडला. त्यांना ५०-५० कोटी रुपये मिळाले. आमचे पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे आजारी असताना त्यांनी हे केले. त्यामुळे २० जून हा गद्दार दिवस साजरा करावा असा प्रस्ताव संजय राऊतांनी या पत्राद्वारे मांडला आहे. यूएनचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांना लिहिलेल्या पत्रात संजय राऊत यांनी २० जून हा दिवस जागतिक गद्दार दिन म्हणून ओळखला जावा, असे म्हटले आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासाठी प्रयत्न करावे, असेही राऊत यांनी म्हटले आहे.

दरम्यान, २० जून रोजी शिवसेना ठाकरे गटाकडून शिंदे गटाला लक्ष्य करण्यात येत आहे. त्यात, शिवसेना युवा नेते आमदार आदित्य ठाकरे हेही मागे नाहीत. आदित्य यांनी ट्विटरवरुन केवळ… ५० खोके एवढे दोनच शब्द लिहिले आहेत. आदित्य यांच्या या ट्विटवर अनेकांनी कमेंट करुन एकदम ओके… असे म्हटलंय.

दरम्यान, शिवसेना पक्षातील बंडा आज म्हणजेच २० जून २०२२ रोजी सुरुवात झाली होती. त्यानंतर, शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन राजकीय पक्ष उदयास आले. या दोन्ही पक्षातील वाद अत्यंत विकोपाला गेला असून पक्षाच्या नावावरुन आणि चिन्हावरुनही राजकीय व कायदेशीर लढाई महाराष्ट्राने पाहिली.


Back to top button
Don`t copy text!