स्थैर्य, मुंबई, दि. 13 : आपल्या वाढदिवसादिनी मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रगल्भता आणि संवेदनशीलता दाखवत एका नवजात बाळाच्या शस्त्रक्रियेसाठी 1 लाख रूपयांची मदत केली आहे. आदित्य ठाकरे यांच्या या कृतीची सोशल मीडियावर चर्चा केली जात असून त्यांचं यासाठी कौतुक होत आहे.
घनसोली परिसरात राहणाऱ्या अब्दुल अन्सारी यांच्या घरी काही दिवसांपूर्वी एका बाळाचा जन्म झाला. परंतू अंसारी यांच्या बाळाच्या हृदयात जन्मतःच तीन ब्लॉकेज व एक छिद्र असल्याचं निदान झालं होतं. ऐरोलीच्या महापालिका रुग्णालयात जन्मलेल्या या बाळाच्या जीवाला धोका असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
दरम्यानच्या काळात बाळाला मदत करावी अशी याचना अन्सारी कुटुंबीयांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली होती. सोशल मीडियातून आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत ही बाब आली. त्यांनी लगेचच युवा सेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांमार्फत याबाबत माहिती घेतली आणि अन्सारी यांना एक लाख रुपयांची मदत केली.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी त्यांचा वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. होर्डिंग, हारतुरे तसंच इतर कोणताही अनावश्यक खर्च करू नका. गरजू लोकांना मदत करा, अशी विनंती आदित्य ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केली आहे.