
दैनिक स्थैर्य | दि. १३ ऑगस्ट २०२३ | फलटण |
‘व्यसनाधीनता –
असे मनाची आत्मदुर्बलता |
शरीर खंगत जाते पाहता पाहता ॥
मृत्यू कावटाळतो बघता बघता ॥|
व्यसनाधीनहो,
त्यातून लवकर मुक्त व्हा हो |
आपण या जगामध्ये का आणि कशासाठी आलो आहोत,
याचे कृपया भान असू द्या हो ॥’
वरील पंक्ती व्यसनाधीन लोकांसाठी बोलाव्या लागत आहेत. आज समाजात व्यसनाधीन झालेल्या लोकांची संख्या कितीतरी अधिक आहे. त्यामुळे अनेक कुटुंबे, घरेदारे उद्ध्वस्त झालेली आपण रोजी बघत आहोत. अशा लोकांना व्यसनाच्या खोल दरीतून बाहेर काढण्यासाठी एक व्यापक चळवळ उभारली पाहिजे. यात त्या व्यक्तीबरोबरच समाजाचे, देशाचेही भले होणार आहे.
काय आहे व्यसनाधीनता ?
‘व्यसनाधीनता’ ही एक मनाची स्थिती आहे की, ज्यामध्ये मनुष्य एखाद्या गोष्टीच्या आहारी जातो आणि तो ती मिळविण्यासाठी काहीही करू शकतो. माणूस हा दारू, सिगरेट, गांजा, चरस, मोबाइल, कॉम्प्युटर गेम्स अशा अनेक गोष्टींच्या मागे लागून व्यसनाधीन होऊ शकतो.
व्यसन लागण्याची कारणे आपण पाहुयात :
- मज्जा म्हणून सुरू करणे – विशेषतः हे कारण तरुण मुलांमध्ये आढळते. शाळेतून कॉलेजमध्ये गेल्यावर काहीतरी नवीन करायचे म्हणून व्यसन करून बघितली जातात.
- प्रेस्टीज maintain करण्यासाठी – स्वतःला उच्चभ्रू समजणारे लोक स्वतःची ‘पोझिशन’ राखण्यासाठी दारूच्या पार्ट्या आयोजित करतात आणि मग हळूहळू व्यसनाधीन होतात.
- नैराश्येतून – मनासारखी कुठलीही गोष्ट आयुष्यात होत नसेल तर सहजपणे नाईलाजास्तव आपण व्यसनांकडे वळतो.
- मानसिक ताणतणाव आणि इर्षा – आयुष्यात काहीतरी मिळविण्यासाठी होणारी चढाओढ की, ज्यामुळे मनाला कुठेतरी आधार हवा असतो आणि तो व्यसनातून मिळतो असे वाटते.
या सर्व कारणांमध्ये एक गोष्ट नक्कीच सारखी आहे आणि ती म्हणजे ‘संगत’. सारख्या विचारांची (मग ती वाईट का असोत) माणसे एकत्र आली की, तो जे करतो ते आपण केलेच म्हणून समजा.
व्यसनांचे तोटे –
१. एखादा माणूस व्यसनाधीन झाला की त्याला आणि त्याच्या कुटुंबाला त्याची झळ लागल्यावाचून राहात नाही. सरळ आणि सुरळीत चाललेले जीवन हळूहळू वेगळ्या वळणावर येते आणि त्याचा दाह हा सर्वच कुटुंबाला सोसावा लागतो. आपले व्यसन राखण्यासाठी मग तो कोणत्याही थराला जातो आणि आयुष्याची घडी विस्कटते.
२. कुठलेही वाईट व्यसन हे शरीराला १०० टक्के हानिकारक असते, यात काहीच शंका नाही. दारू पिण्याने लिव्हरचा कॅन्सर होतो, हाडे ठिसूळ आणि खराब होतात. सिगारेट ओढल्याने फुफ्फुसाचा कॅन्सर होतो. तंबाखू-गुटखा खाण्याने तोंडाचा कॅन्सर होतो.
३. व्यसनांच्या आहारी जाऊन मनुष्य आपले कुटुंब, आपली नोकरी, आपले जीवनच हरवून बसतो.
४. व्यसनामध्ये धुंद असताना आपण काय करतो आहे, हे कळत नाही आणि मग बरेच गुन्हे जसे की, अब्रू लुटणे, खून करणे, चोरी करणे, मारामारी करणे केले जाते. त्याचा नंतर पश्चाताप होतही असेल, पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. आपण अगोदरच गुन्हेगार झालेलो असतो.
व्यसनाधीन माणसाला त्या (व्यसन लागलेल्या) गोष्टीचे ‘क्रेव्हिंग’ होते आणि मग तो मिळविण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. ती गोष्ट त्याला जर मिळाली नाही तर तो मनुष्य ‘विड्रॉवल’मध्ये जातो आणि मग विनाशाची मालिकाच सुरू होते जणू.
- कशातच मन लागत नाही.
- हात थरथरायला लागतात.
- तो अक्षरशः त्या गोष्टी साठी वेडा होतो आणि मग
- त्याला admit केल्या वाचून गत्यंतरच नसते नाहीतर तो आत्महत्यासुद्धा करू शकतो .
त्यामुळे व्यसन करण्याआधी हे भयंकर परिणाम लक्षात घेतले पाहिजेत.
व्यसनांचे फायदे – शून्य (०)
या व्यसनाची खरच गरज असते का?
त्यासाठी आत्म-परिक्षणाची गरज आहे, असे मला वाटते. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही ‘प्रॉब्लेम्स’ हे असतातच. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होतेच असे नाही. पण परिस्थितीचा स्वीकार करणे हे आपल्या हातात नक्कीच आहे. व्यसनच करायचेच असेल तर ते भगवंत प्राप्तीचे करावे. गोंदवलेकर महाराज नेहमी म्हणत असत ‘नामाचे व्यसन’ लावून घ्या, भगवंत मिळल्यावाचून राहणार नाही. शेवटी माणसाला आयुष्यात काय पाहिजे असते सुख आणि समाधान. मग वाईट गोष्टींना जवळ करण्यापेक्षा चांगल्या गोष्टींना जवळ केलेत तर तोटा नक्कीच होणार नाही.
व्यसनाधीनतेबद्दल लिहिण्याचे कारण हेच की, सध्या इतके लोक व्यसनाधीन होताना दिसत आहेत की हे का? आणि कशासाठी? हेच कळत नाही. बरेच लोक व्यसनमुक्ती केंद्रात पण जाऊन आले आहेत, पण जोपर्यंत स्वतःला त्यातून मुक्त होण्याची मनापासून इच्छा होत नाही तोपर्यंत सर्व प्रयत्न व्यर्थ आहेत.
व्यसन सोडण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स :-
- मनात दृढ निश्चय करा की, मला हे व्यसन सोडायचेच आहे.
- वाईट संगत सोडा.
- सत्संगात राहिलात तर ते लवकर सुटण्यास मदत होईल.
- व्यसन हे एका रात्रीत सुटले पाहिजे. मन फार चंचल आहे. ते नेहमी भरकटते. त्याला काबूत ठेवून निश्चय घेणे इष्टच.
It’s an ALL OR NONE phenomenon .
हळूहळू रोज थोडे सोडूयात, असा विचार केलात तर नक्कीच सुटणार नाही. व्यसनाने (वाईट गोष्टींचे) कुणाचेच कधी भले झाले नाही, हे पक्के जाणा. व्यसन सोडले नाहीत तर विनाश अटळ आहे, नेहमीपेक्षा मृत्यू लवकर येईल, हे नक्की.. स्वतःचे मन दुसर्या चांगल्या गोष्टीत गुंतवा. पूर्वीचे छंद जोपासा आणि ते वाढवा. एकदा मन त्यात रमले की त्या गोष्टीची (व्यसन लागलेल्या) आठवण होणारच नाही.
तर प्रियजन हो, आयुष्य खूप सुंदर आहे. ते असे व्यसनामध्ये व्यर्थ का घालवायचे, का काही सकारात्मक करून दाखवायचे, हे आपणच ठरवू शकतो.
जाता जाता नक्की सांगावेसे वाटते,
‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार,
व्यसनाधीन होणे, हा मार्ग चुकीचा आहे फार |
सुखं आणि समाधान मिळेल तुम्हाला नक्कीच यार,
जेव्हा तुम्हाला होईल तुमच्या आत्म्याचा साक्षात्कार ॥
जय श्रीराम…
– डॉ. प्रसाद जोशी, अस्थीरोग शल्यचिकित्सक, जोशी हॉस्पिटल प्रा. लि., फलटण