दैनिक स्थैर्य | दि. २६ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
कार्यकर्त्यांनी आता आपल्या कामाची पद्धत बदलायला हवी. आपल्या मतदारसंघातील एखादे विकासकाम करायचे झाल्यास संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही. आता नुसत्या फोनवरून कामे होत नाहीत. कार्यकर्त्यांनी आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे. संघर्ष करूनच आज कामे करावी लागतात, असे आवाहन विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांना ‘लक्ष्मी-विलास‘ या त्यांच्या फलटणमधील निवासस्थानी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रीमंत रामराजे म्हणाले की, आता २७ फेब्रुवारीपासून विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात आम्ही आपल्या मतदारसंघातील विकास कामांसाठी रणनीती आखून मुद्दे मांडू. पण, आपण मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी नुसते फोन करून चालणार नाही. आपल्यालाही यापुढे संघर्ष करावा लागणार आहे. तुम्ही जर दहा-वीस हजार लोकांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला, तरच जिल्हाधिकार्यांवर दबाव येईल. आणि त्यानंतर आपसूकच त्यांच्या खालील अभियंते, अधिकारी यांच्यावर दबाव येऊन कामे होतील. तरीही कामे होत नसतील तर शासकीय कार्यालयांवर मोर्च काढून, आंदोलने करून, कुलूपे ठोकून कामे करायला भाग पाडले पाहिजे. म्हणजे जे यापूर्वी विरोधी पक्ष करत होते ते सर्व आता आपल्याला करावे लागणार आहे. त्यामुळे आता कार्यकर्त्यांनीही गावपातळीवर नुसते काम करूया, असे म्हणून चालणार नाही, तर विरोधात वातावरण तयार केले पाहिजे.
सत्ताधार्यांबद्दल बोलताना श्रीमंत रामराजे म्हणाले की, पूर्वी आपली सत्ता होती, त्यामुळे फोन केला तर चालत होता. आता आपण सत्तेत राहिलो नाही. आपल्याला आता मानसिकता बदलायला हवी. आपल्या कामाची पद्धत बदलायला हवी. त्यात तुमची चूक नाही. मी किंवा आपले आमदार आपल्याला विरोधात बसायची सवय नाही व सत्ताधार्यांना सत्तेत बसायची सवय नाही. ही परिस्थिती आज महाराष्ट्र राज्याची आहे. त्यांना अजून कळालेले नाही की सत्ता काय असते. माझे सर्व पक्षांशी चांगले संबंध आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही चांगले संबंध आहेत. पण त्याला काही राजकीय मर्यादा आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत स्तरावरही कामांबाबत आपण त्यांच्याकडे गेलो तर ते त्यांच्याच माणसांची बाजू घेणार. त्यामुळे तुम्ही एखादा चुकीचा निर्णय झाला असेल तर त्याच्या विरोधात आवाजा उठवला पाहिजे. ती गोष्ट मंत्र्यांपर्यंत पोहोचवायला शिकले पाहिजे. तुम्ही गावपातळीवर नुसते याची बदली करा, त्याला नोकरीला लावा किंवा पोलीस चौकीची कामे याव्यतिरिक्त आता विचार करायला शिकले पाहिजे. विरोधकांनी उज्ज्वला गॅस योजना दिल्लीत बसून गावातील गरजू महिलांपर्यंत पोहोचवली, त्यांनी मोबाईलचा वापर करत स्वत:च्या यंत्रणा वापरल्या. आता तुमच्याकडे भरपूर सोयी-सुविधा आहेत.
पुढे बोलताना श्रीमंत रामराजे म्हणाले की, बजेटमध्ये मंजूर झालेली कामे मार्गी लागलेली आहेत. डीपीडीसीची कामेही मंजूर होऊन वर्कऑर्डर निघालेली आहे. त्यामुळे त्या कामांची आता काळजी करू नका. त्या कामांचा विषय सुटलेला आहे.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर टीका करताना श्रीमंत रामराजे म्हणाले की, कशाचा रणजितदादा? त्या ‘दादा’मध्ये काही दम नाही. त्यांच्या सहा मतदारसंघातील जिल्ह्यांमध्ये काय परिस्थिती आहे, ते पाहा. ते नुसतेच बोलतायंत. त्यांची कामाची पद्धत म्हणजे मंत्र्यांकडे जायचे, बसायचे आणि उठायचेच नाही. मंत्री कंटाळून सांगतो की करतो काम बाबा. खासदार झाले की त्यांनी सुरू केला पाण्याचा विषय. तुम्हाला निरा-देवधरचे पाणी दिले, असे म्हणतात. ते पाणी धरणातच आहे. कुठेच दिले नाही. त्यांना काही समजत नाही.
शेवटी कार्यकर्त्यांना श्रीमंत रामराजे म्हणाले की, दालवडी व बाणगंगेपुढील सर्व गावांनी एकत्र येऊन पाण्यासाठी माझ्या विरोधातच मोर्चा काढा. काहीतरी करा, काहीतरी पाय हलवा. नुसते फोन करू नका. मोर्चा काढल्याने काहीतरी निघेल. आता तुम्हाला संघर्ष केल्याशिवाय पर्याय राहिला नाही.
या मेळाव्याला फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील शेकडो कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.