श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी समाजकारणासह राजकारणात सक्रिय व्हावे; फलटण तालुक्यातील युवकांकडून साद


दैनिक स्थैर्य | दि. २६ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे सुपुत्र माजी नगरसेवक व फलटणचे युवराज श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण तालुक्याच्या समाजकारणामध्ये व राजकारणामध्ये सक्रिय व्हावे, अशी साद फलटण तालुक्यातील युवकांनी श्रीमंत अनिकेतराजे यांना घातलेली आहे.

श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण तालुक्यामध्ये सक्रिय व्हावे, या आशयाच्या पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सन १९९१ साली फलटण नगर परिषदेच्या माध्यमातून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण तालुक्याच्या राजकारणामध्ये दमदार असा प्रवेश केला. त्यानंतर फलटण शहरासह तालुक्याची आजअखेर सत्ता श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडेच आहे. सन १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्थापन झाल्यानंतर माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला बळकट करण्याचे काम श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

श्रीमंत रामराजे यांचा ७५ वा म्हणजेच अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा होत आहे. आता येणार्‍या काळामध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा वारसा पुढे चालवण्यासाठी श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण तालुक्याच्या समाजकारणामध्ये व राजकारणामध्ये यावे, अशी भावना अनेकांची आहे. येणार्‍या नगरपालिका निवडणुकांमध्ये श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी प्रवेश करावा व राजकारणाची पुन्हा दमदार सुरुवात करावी, अशा आशयाच्या पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर हे विधिज्ञ असून मा. उच्च न्यायालयासह मा. सर्वोच्च न्यायालयामध्ये काम करण्याचा त्यांना मोठा अनुभव आहे. त्यांच्या या अनुभवाचा फायदा फलटण तालुक्याला व्हावा, म्हणूनच त्यांनी फलटण तालुक्याच्या राजकारणामध्ये प्रवेश करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली फलटण तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसपुरस्कृत राजे गटाची एकहाती सत्ता आहे. आगामी काळामध्ये श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण तालुक्याच्या राजकारणात प्रवेश करून फलटण तालुक्यातील युवकांचा आवाज बनावे, असेही मत राजे गटातील कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.

श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्यासारखे अभ्यासू व्यक्तिमत्व आगामी काळामध्ये फलटण शहरासह तालुक्याच्या राजकारणामध्ये सक्रिय होणार का? याकडे आता तालुक्याचे लक्ष लागले आहे.


Back to top button
Don`t copy text!