दैनिक स्थैर्य । दि. २७ जुन २०२१ । सातारा । साताऱ्यातील करोना रूग्णांची संख्या कमी झाल्यानंतर कडक निर्बंधामधून सवलत देण्यात आली आहे. तरी जिल्ह्यात आठवड्याच्या शेवटी शनिवार, रविवारी कडक लॉकडाऊनचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याने शनिवारी साताऱ्यात पोवई नाक्यावर शहर पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली. यावेळी विनाकारण बाहेर फिरणाऱ्या लोकांच्यावर पोलिसांनी कडक कारवाई केल्याची माहिती पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, दुसऱ्या लाटेत सातारा जिल्ह्यात करोनाचे रूग्ण मोठ्या संख्येने वाढल्यामुळे जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लावले होते. मात्र, दरम्यानच्या काळात ही रूग्ण संख्या कमी आल्याने कडक निर्बंध उठवून सोमवार ते शुक्रवार या कालावधीत सर्व आस्थापना सुरू ठेवण्याचे तर शनिवार व रविवार या दोन दिवशी सर्व अस्थापना अत्यावश्यक सेवा वगळता बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तरीही शनिवारी शहरात अनेक नागरिक हे रस्त्यावर मोठ्याप्रमाणात आल्याने सातारा शहर पोलिसांनी सायंकाळी पोवई नाक्यावर नाकाबंदी केली. यावेळी पोलिसांनी प्रत्येक वाहनाला अडवून बाहेर पडण्याच्या कारणाची खातरजमा करून त्यांना सोडले तर विनाकारण बाहेर पडलेल्या वाहनधारकांवर कारवाई केली.
ही कारवाई पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार, प्रशांत बधे, माने, पोलीस उपनिरीक्षक रोकडे यांच्यासह शहर पोलीस ठाण्याच्या सर्व अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी केली.