दैनिक स्थैर्य | दि. २१ सप्टेंबर २०२४ | फलटण |
समाजात विविध क्षेत्रात कार्य करीत असताना केलेल्या कार्याबद्दल समाजाकडून झालेल्या सत्कारामुळे कार्यास प्रेरणा मिळते, जबाबदारीची जाणीव निर्माण होते. जैन समाजातील युवक-युवती यांना समाजातील पदाधिकारी, ज्येष्ठ व्यक्ती यांनी योग्य मार्गदर्शन करून भविष्यातील आव्हाने समर्थपणे पेलण्यास सक्षम केले पाहिजे. समाजातील उल्लेखनीय कामगिरीची नेहमीच दखल घेणार्या संगिनी फोरमचे सामाजिक कार्य प्रशंसनीय आहे, असे प्रतिपादन फलटणचे जिल्हा न्यायाधीश श्री. प्रवीण चतुर यांनी केले.
संगिनी फोरम आयोजित कृषी उत्पन्न बाजार समिती, फलटण भुसार आणि कांदा आडत व्यापारी असोसिएशन नवनिर्वाचित पदाधिकारी यांच्या सत्कार कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
भुसार व कांदा आडत व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेले प्रसिद्ध व्यापारी चेतन घडिया, उपाध्यक्षपदी निवड झालेले राजेश शहा, सचिवपदी निवड झालेले धीरेन शहा यांचा यावेळी सन्मान चिन्ह, श्रीफळ देऊन चतुर, शहा, मंगेशशेठ दोशी, राजेंद्र कोठारी, विशाल शहा, अपर्णा जैन यांच्या हस्ते श्री चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर येथे सत्कार संपन्न झाला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून फलटण शहर पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मंगेशशेठ दोशी, श्री चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिराचे विश्वस्त श्री. राजेंद्र कोठारी, साप्ताहिक आदेशचे संपादक श्री. विशाल शहा, जैन सोशल ग्रुपचे उपाध्यक्ष श्रीपाल जैन, संगिनी फोरमच्या अध्यक्षा सौ. अपर्णा जैन, माजी अध्यक्ष सौ. नीना कोठारी, सचिव सौ. प्रज्ञा दोशी, खजिनदार सौ. मनिषा घडिया, सौ. विद्याताई चतुर मॅडम, संगिनी उपाध्यक्ष सौ. मनिषा व्होरा, सौ. किशोरी शहा, सौ. जयश्री उपाध्ये, सौ.संध्या महाजन, सौ. संगीता जैन, सत्कारमूर्तींचे कुटुंबीय तसेच बहुसंख्य संगिनी सदस्या व श्रावक-श्राविका उपस्थित होत्या.
यावेळी शहर पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे अभिनंदन करून भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. जैन समाज हा अल्पसंख्यांक आहे, फलटणमधील सकल जैन समाज नेहमीच एकत्र असतो, समाजाची एकजूट टिकवण्यासाठी सर्वांनी कायमच एकत्र आले पाहिजे, असे आवाहन शहा यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात मंगलाचरणाने करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचा संगिनी फोरमकडून उचित सत्कार करण्यात आला. श्रीपाल जैन यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. आभार राजेंद्र कोठारी यांनी मानले.