दैनिक स्थैर्य | दि. ७ डिसेंबर २०२३ | फलटण |
फलटणमधील ब्राह्मण गल्ली येथे भटक्या कुत्र्यावर अॅसिड हल्ला करून त्याला ठार मारण्यात आले आहे. या क्रूरतेमुळे फलटणकरांच्या प्राणीदयेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. अशी प्रवृत्ती समाजाचा निर्दयीपणा दर्शवत असून प्राणीमित्रांनी अशा घटना टाळण्यासाठी समोर आले पाहिजे.
फलटण शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांची समस्या मोठ्या प्रमाणावर आहे. नगर परिषदेच्या वतीने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे; परंतु वास्तविक अशा कोणत्याही उपाययोजना नगरपरिषदेच्या वतीने राबवताना दिसून येत नाहीत.
गल्लोगल्ली फिरणार्या भटक्या कुत्र्यांनी सर्वसामान्यांना बेजार केले आहे. लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांच्या मागे भटकी कुत्रे लागत असल्यामुळे विविध प्रश्न निर्माण होत असतात. मात्र, अशा फिरणार्या भटक्या कुत्र्यांवर अॅसिड टाकून त्यांना ठार मारणे, ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. फलटणमध्ये असे प्रकार होऊ लागल्याने अनेकजण याबाबत खंत व्यक्त करीत आहेत.
हा प्रकार कोणी केला, कधी केला याबाबत कोणतीही स्पष्टता नसली तरी असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी नगरपरिषदेच्या वतीने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त लवकरात लवकर करणे गरजेचे आहे.