स्थैर्य, फलटण, दि.25: महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या पाठपुराव्यानंतर मराठी वृतपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रपुरुष / थोर व्यक्ती यांच्या शासकीय अभिवादन यादीत नव्याने समाविष्ट करण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
या बाबत सविस्तर माहिती देताना बेडकिहाळ यांनी सांगितले की, ‘‘राज्य शासनाच्या मंत्रालय, विधिमंडळ, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद व अन्य शासकीय, निमशासकीय जिल्हा व तालुका कार्यालये यातून विविध क्षेत्रात ऐतिहासिक उल्लेखनीय असे कार्य करणार्या राष्ट्रपुरुष / थोर व्यक्तींना त्यांच्या जयंती/पुण्यतिथी दिवशी राज्यशासनाच्या वतीने अभिवादन करण्यात येते. या शासकीय यादीमध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचे नाव शासनाने समाविष्ट करावे, अशी मागणी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या माध्यमातून मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे व उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांचेकडे केली होती. आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या जन्मगावी पोंभुर्ले ता.देवगड जि.सिंधुदुर्ग येथे महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीने उभारलेल्या ‘दर्पण’कारांच्या स्मारकाच्या विकास व सुशोभीकरण कामासाठी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी सर्व संबधित मंत्री, सचिव व अधिकारी यांची एक विशेष बैठक मंत्रालयातील त्यांच्या दालनात दि.5 जानेवारी 2021 रोजी आयोजित केली होती. त्यामध्ये विकास व सुशोभिकरण कामाबरोबरच आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचे नाव राज्यशासनाच्या अभिवादन यादीत घ्यावे, अशी मागणी आम्ही आग्रहाने केली होती. ना.अजितदादा पवार यांनी यावेळी उपस्थित सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकार्यांकडून या यादीची सविस्तर माहिती घेऊन तातडीने बाळशास्त्री जांभेकरांचे नाव या यादीत घ्यावे, असे निर्देश या बैठकीतच दिले होते. त्यानंतर राज्यशासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन परिपत्रक क्रमांक जपूती2020/प्र.क्र.95/29 दिनांक 14 जानेवारी 2021 नुसार सदर नाव या यादीत समाविष्ट केल्याचे शासनाच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे.’’
‘‘सदर शासन परिपत्रकानुसार शासकीय कार्यालयांमधून येत्या 16 फेब्रुवारी रोजी जांभेकरांना अभिवादन करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. तथापी, जांभेकरांची जन्म तारीख 16 फेब्रुवारी की 20 फेब्रुवारी यामध्ये काही निश्चित पुरावा उपलब्ध नसल्याने सदर अभिवादन जांभेकरांच्या पुण्यतिथी दिवशी म्हणजेच 17 मे रोजी किंवा जांभेकरांनी सुरु केलेल्या पहिल्या मराठी ‘दर्पण’ वृत्तपत्राच्या शुभारंभ दिनी म्हणजेच 6 जानेवारी राज्यस्तरीय पत्रकार दिनादिवशी करावे, अशी सुधारित मागणी आम्ही तातडीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव यांचेकडे केली आहे, असेही बेडकिहाळ यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या आग्रही मागणी नुसार राज्यासह संपूर्ण देशातील मराठी वृत्तपत्रे, पत्रकार यांची अस्मिता व मानबिंदू असलेल्या आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या नावाचा राज्यशासनाच्या शासकीय अभिवादन यादीत तातडीने समावेश केल्याबद्दल संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे व उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांचे खास अभिनंदन करण्यात आले आहे.