‘आचार्य आर्यनंदी दिनदर्शिके’चे अरविंद मेहतांच्या हस्ते प्रकाशन; जैन समाजाच्या कार्याचा गौरव


अखिल दिगंबर जैन सैतवाल संस्थेचा उपक्रम; फलटणमध्ये धार्मिक उत्साहात सोहळा संपन्न. गरजू विद्यार्थ्यांसाठी संस्थेचे कार्य कौतुकास्पद.

स्थैर्य, फलटण, दि. २८ डिसेंबर : अखिल दिगंबर जैन सैतवाल संस्थेचे धार्मिक, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील योगदान मोठे आहे. संस्थेद्वारे प्रकाशित करण्यात आलेली दिनदर्शिका समाजासाठी अत्यंत उपयुक्त असून, त्याद्वारे सण, उत्सव आणि धार्मिक कार्यक्रमांची अचूक माहिती मिळते, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांनी केले.

जैन धर्मीयांची ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फलटण नगरीत ‘वात्सल्यमूर्ती आचार्य श्री आर्यनंदी दिनदर्शिका २०२६’ चा प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला. येथील श्री १००८ चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिरात आयोजित या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता आणि सौ. इंदुमती मेहता यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.

अरविंद मेहता पुढे म्हणाले की, जैन समाजातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बिनव्याजी शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देण्याची उत्तम सोय संस्थेने केली आहे. सातारा जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

श्री १००८ चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिरचे विश्वस्त उदयभई शहा यांनी आपल्या मनोगतात आचार्य आर्यनंदी महाराजांच्या फलटण येथील चातुर्मास कालावधीतील आठवणींना उजाळा दिला. महाराजांनी तीर्थरक्षेसाठी केलेले कार्य भरीव असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रारंभी स्वागत आणि प्रास्ताविक करताना जिल्हाध्यक्ष श्रीपाल जैन यांनी फलटणला ‘जैन धर्मीयांची दक्षिण काशी’ का म्हटले जाते, हे विशद केले. फलटणमध्ये प्रथम आचार्य श्री १०८ शांतीसागर महाराज यांचे तीन चातुर्मास झाल्याचा उल्लेख त्यांनी केला. तसेच आचार्य आर्यनंदी महाराजांनी गुरुकुल स्थापन करून गरीब मुलांसाठी शिक्षणाची द्वारे खुली केल्याचे सांगितले.

या कार्यक्रमास विश्वस्त उदयभई शहा, राजेंद्रभई कोठारी, अखिल दिगंबर जैन सैतवाल संस्थेचे सातारा जिल्हाध्यक्ष श्रीपाल जैन, उपाध्यक्ष रमणलाल रणदिवे, खजिनदार श्रीकांत सवळे, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक शशीकुमार रणदिवे, निवृत्त उपप्राचार्य सुरेश जैन सर, शरद सवळे, सौ. अपर्णा जैन, सौ. संगीता जैन यांच्यासह बहुसंख्य श्रावक-श्राविका उपस्थित होते.

कार्यक्रमानंतर उपस्थित सर्व समाज बांधवांना दिनदर्शिकेची एक प्रत नववर्षाची भेट म्हणून देण्यात आली. आभार प्रदर्शन सौ. अपर्णा जैन यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!