दैनिक स्थैर्य | दि. १५ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
फलटण शहरातील आयडीबीआयच्या एटीएम मशीनमध्ये दि. ०९ सप्टेंबर २०२४ रोजी रुपये २८,३०० भरत असताना सचिन रामराव निंबाळकर (वय ४३, श्रीराम फूडस् खाद्य पदार्थ विक्री, राहणार वाठार निंबाळकर, तालुका फलटण) हे मशीनमध्ये कॅश न भरता ड्रॉवरमध्ये पैसे तसेच ठेवून निघून गेले होते. त्यानंतर तेथे आलेला आरोपी योगेश शंकर जाधव (वय ३३, राहणार सोमवार पेठ, फलटण) हा ते पैसे घेऊन पसार झाला होता. या चोरीची नोंद निंबाळकर यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली होती.
या चोरीचा तपास फलटण शहर पोलीस ठाण्यातील पो. हवा. सचिन जगताप, पो. शि. काकासो कर्णे, सचिन पाटोळे, जितेंद्र टिके यांनी कौशल्याने करून या गुन्ह्यातील रोख रक्कम नेणारा आरोपी योगेश शंकर जाधव यास सोमवार, १४ ऑक्टोबर २०२४ रोजी अटक केली आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. या आरोपीकडून चोरीला गेलेली सर्व रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
या गुन्ह्याचा अधिक तपास म.पो.ह. माधवी बोडके करीत आहेत.