दैनिक स्थैर्य | दि. २५ सप्टेंबर २०२३ | फलटण |
फलटण शहरामध्ये कोयत्याने दहशत माजवून व्यापार्यांना लुटणार्या व खंडणी मागणार्या सराईत गुन्हेगारांना फलटण शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाकडून चार तासात जेरबंद करण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, २४ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ४.४१ वाजण्याच्या सुमारास शहरातील रविवार पेठेतील उघड्या मारूती मंदिरासमोर मॅचिंग सेंटर दुकानात दुकान मालक अरिजय दोशी हे ग्राहकांना अस्तर कपडा देत असताना आदित्य अहिवळे हा हातात कोयता घेऊन तसेच त्याचे साथीदार हातात तलवार घेऊन तेथे आले. त्यांनी अरिजय दोशी यांना कोयत्याचा धाक दाखवून दुकानाच्या काऊंटरमधून अंदाजे २५ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेऊन तेथे निघून गेले. तसेच वैभव रमणलाल दोशी (वय ५३) यांच्या फुलचंद दुलचंद दोशी यांच्या किराणा मालाच्या दुकानात शिरून वैभव दोशी यांना तलवारीचा व कोयत्याचा धाक दाखवून आम्हाला महिन्याला ३ हजार रुपये हप्ता दिला पाहिजे तरच तुम्ही धंदा करू शकाल, नाहीतर तुम्हाला कोयत्याने जीवे मारू, अशी दमदाटी केली. तसेच तौसिफ निजामुद्दीने शेख यांच्या दुकानातून बॅट हिसकावून घेऊन दुकानातून बाहेर जाऊन दुकानावर दगडफेक केली. या आरोपींविरोधात फलटण शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हा गुन्हा घडल्यानंतर घटनास्थळी शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक दीपाली गायकवाड व गुन्हे प्रकटीकरण पथकाने तात्काळ जाऊन त्या ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता हे आरोपी पोलीस ठाण्यावरील रेकॉर्डवरील सराईत आरोपी असून त्यांनीच हा गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाले. त्याप्रमाणे आरोपींचा शोध घेत असताना हे आरोपी मुंबईला पळून जाण्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर या आरोपींचा पाठलाग करून लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांना ताब्यात घेण्यात आले. या आरोपींकडे सदर गुन्ह्यांच्या अनुषंगाने अधिक चौकशी करून त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या गुन्ह्यांचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर करत आहेत.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या सूचनांनुसार पोलीस निरीक्षक सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपाली गायकवाड, सहा. फौजदार साळुंखे, पो.ह. वाडकर, धापते, धायगुडे, फाळके, काळुखे, पो.ना. जगताप, पो.कॉ. पाटोळे, कर्णे, खराडे, धायगुडे, टिके, जगदाळे, घोरपडे, देशमुख, जगताप, लोलापोड, मपोना फाळके, पवार, मपोकॉ. करपे यांनी केली.