स्थैर्य, जामखेड, दि. 04 : मुंबई येथील कलिंगड व्यापारी हासन उमर शेख (वय 50) यांचा दोन वर्षांपूर्वी दोरीने गळा आवळून खून झाला होता. या गुन्ह्यातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली होती.त्यातील एक आरोपी तेव्हापासून फरार होता. त्या आरोपीला पोलिसांनी आज मोठ्या शिताफीने जेरबंद केले आहे. कर्जतच्या डीवायएसपी कार्यालयातील पोलिसांनी ही दमदार कामगिरी केली.
मुंबईच्या व्यापाऱ्याने खरेदी केलेल्या कलिंगडाची परस्पर विक्री करण्याच्या उद्देशाने चौघांनी संगनमताने हा खून केला होता. त्यातील मोहन कुंडलिक भोरे, अक्षय रामदास राऊत, चंद्रकांत महादेव राऊत या तिघांना पोलिसांनी अटक केली होती. यातील नंदू तुकाराम पारे (वय 50, रा. पारेवाडी, ता.जामखेड) हा आरोपी गुन्हा घडल्यापासून फरार होता. या आरोपीबाबत डीवायएसपी संजय सातव यांना गुप्त बातमीदाराकडून मिळाली.
त्यानुसार सातव यांनी नगर- पुणे महामार्गावरील गव्हाणवाडी येथे पोलिसांचे पथक रवाना करून सापळा लावला. सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल हृदय घोडके, सागर जंगम, संतोष साबळे, आदित्य बेल्हेकर यांच्या पथकाला हा आरोपी एका टेम्पोमध्ये बसून येत असल्याचे दिसून आले. पोलीस पाहताच आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यास पकडले. या आरोपीचा शोध घेण्यासाठी मोबाईल सेलचे पोलीस कर्मचाऱ्यांनी तांत्रिक मदत केली.