दैनिक स्थैर्य | दि. २४ जानेवारी २०२४ | फलटण |
दुधेबावी (ता. फलटण) येथे सामाईक जमीन वाटून देत नाही, या कारणावरून चौघाजणांनी ज्ञानदेव महादेव सोनवलकर (वय ४०, रा. दुधेबावी, ता. फलटण) यांचा लोखंडी गज, कुर्हाडीने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले होते. त्यानंतर जखमी ज्ञानदेव महादेव सोनवलकर यांचा सुविधा हॉस्पिटल, फलटण येथे उपचार घेत असताना मृत्यू झाला होता.
या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी चौघांजणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. हणमंत महादेव सोनवलकर (वय ४८), सुनीता हणमंत सोनवलकर (वय ३८), अनिकेत हणमंत सोनवलकर (वय २३) व शंभूराज हणमंत सोनवलकर (वय २१, सर्व रा. दुधेबावी, ता. फलटण) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.
या गुन्ह्याचा तपास फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक नितीन सावंत, पोलीस उपनिरीक्षक यु. एस. शेख यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र पाठविल होते.
हा खटला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, सातारा व्ही. आर. जोशी यांचे कोर्टात चालला. सरकारतर्फे सहाय्यक संचालक व सरकारी अभियोता, सातारा श्रीमती वैशाली पाटील यांनी कामकाज पाहिले. या केसमध्ये ११ साक्षीदार तपासण्यात येऊन सरकारी वकिलांकडील पुरावे व युतीवाद ग्राह्य मानून न्यायालयाने आज, दि. २४ जानेवारी २०२४ रोजी यातील आरोपी अनिकेत हणमंत सोनवलकर व शंभूराज हणमंत सोनवलकर यांना जन्मठेप व प्रत्येकी ३ लाख रुपये दंडाची शिक्षा व दंड न भरल्यास १ वर्ष साधा कारावास ठोठावण्यात आला आहे. तसेच या दंडाच्या रकमेपैकी ५ लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून मयताच्या कुटुंबियांनी देण्यात यावी, असा आदेश न्यायालयाने दिला आहे आणि आरोपी हणमंत महादेव सोनवलकर व सुनीता हणमंत सोनवलकर यांची खुनाच्या गुन्ह्यातून निर्दोष मुतता करण्यात आली आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस व फलटण ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी म्हणून महिला पोलीस हवालदार साधना कदम व पोलीस अंमलदार बडे यांनी कामकाज पाहिले.