दैनिक स्थैर्य | दि. २५ सप्टेंबर २०२३ | फलटण |
सिद्धेश्वर कुरोली येथील शुभम सदाशिव इनामदार हा युवक गुरुवारी (२१ सप्टेंबर) दुचाकीवरून कराडहून औंधच्या दिशेने येत असताना अज्ञात वाहनाची धडक होऊन गंभीर जखमी झाला. अपघातानंतर मात्र रस्त्यावरून जाणार्या लोकांची वेळेत मदत व उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
सिद्धेश्वर कुरोली येथील शुभम इनामदार (वय २३) चा जन्म गरीब कुटुंबात झाला. घरची परिस्थिती बेताची असल्याने अलीकडच्या काळात कुटुंबाची सर्व जबाबदारी त्याच्याकडे आली होती.
कराड येथे धार्मिक काम आटोपून घरी माघारी येत असताना कळंबी गावाजवळ अज्ञात वाहनाची धडक बसल्याने तो गंभीर जखमी झाला. गंभीर जखमी झाल्यानंतर त्याला तातडीने उपचाराची गरज होती. मात्र, घटनास्थळी त्याला तातडीने कोणतीही मदत मिळाली नाही. यामुळे रक्तस्त्राव जास्त झाल्याने त्याची प्रकृती खालावत गेली. कुरोली गावातील लोक व नातेवाईक घटनास्थळी पोहचल्यानंतर रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली.
ही दुर्दैवी घटना वार्यासारखी कुरोली गावात पोहचल्यानंतर कुरोली गावावर शोककळा पसरली. ऐन गणपती उत्सवात अपघाती मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली.रात्री उशिरा त्याच्यावर कुरोली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
या घटनेची पोलिसांनी सखोल चौकशी करावी व अपघातास कारणीभूत असलेल्या व्यक्तीवर तातडीने कारवाई करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कुरोली ग्रामस्थांनी केली आहे. आरोपी पकडून कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कुरोली येथील ग्रामस्थांनी दिला आहे.