
स्थैर्य, मुंबई, दि.१७: राज्यात स्व.बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना राबवण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यासाठी राज्य आरोग्य हमी सोसायटीस आर्थिक अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल त्याचप्रमाणे विहित पद्धतीने विमा कंपन्यांची निवड करण्यात येईल. या योजनेत महाराष्ट्रातील रस्त्यावर झालेल्या अपघातामधील व्यक्तींना याचा लाभ मिळेल.
ही व्यक्ती कोणत्याही राज्य, देशाची असली तरी देखील त्यांना योग्य ते वैद्यकीय उपचार देण्यात येतील. अपघातग्रस्तांना गोल्डन अवरमध्ये तत्परतेने वैद्यकीय सेवा व आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी या योजनेचा उपयोग होईल. आजमितीस राज्य महामार्ग तसेच ग्रामीण रस्त्यांवर अपघातात दरवर्षी सरासरी ४० हजार व्यक्ती जखमी तर १३ हजार व्यक्ती मरण पावतात. यांना वेळीच उपचार मिळाले तर त्यांचे प्राण वाचू शकले असते. या योजनेत पहिल्या ७२ तासासाठी जवळच्या रुग्णालयांमधून उपचार करण्यात येतील. सुमारे ७४ उपचार पद्धतीतून ३० हजार रुपयांपर्यंतचा खर्च मोफत केला जाईल.
कांदा निर्यात बंदीबाबत केंद्र सरकारला पत्र पाठविणार : कांदा निर्यातबंदी उठविण्यासंदर्भात केंद्र सरकारला पत्र लिहिणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले.
राज्यातील सर्व जिल्ह्यांत होणार कृषी महोत्सव
राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कृषी महोत्सव आयोजित करण्यास बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. हा महोत्सव ५ दिवसांचा असेल कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यास या वर्षात राबविण्यात येईल. पुढील वर्षापासून आत्मा नियामक मंडळाच्यामार्फत हे महोत्सव आयोजित केले जातील. शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठ, कृषी संशोधन केंद्र यांच्यामार्फत आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती उपलब्ध होते तसेच शेतकऱ्यांना ग्राहकांसाठी थेट विक्रीची संधी मिळते. म्हणून या जिल्हा कृषी महोत्सव योजनांचे आयोजन केले जात आहे.