
स्थैर्य,सोलापूर, दि.२६: कोरोना प्रसाराला अटकाव करण्यासाठी तालुक्यातील विविध शासकीय यंत्रणांनी समन्वय ठेवावा. त्याचबरोबर आरोग्य यंत्रणांनी लसीकरणाची मोहीम आणखी प्रभावी करा, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज मंगळवेढा येथे केल्या.
मंगळवेढा तालुक्यातील कोरोना प्रसाराला आळा घालण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री श्री. भरणे यांनी बैठक घेतली. त्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या.
तहसीलदार कार्यालयात ही बैठक झाली. बैठकीला नगराध्यक्ष अरुणा माळी, पंचायत समिती सभापती प्रेरणा मासाळ, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, तहसीलदार स्वप्निल रावडे, गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नंदकुमार शिंदे, मंगळवेढा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निशीकांत प्रचंडराव आदी उपस्थित होते.
श्री. भरणे यांनी सांगितले की, मंगळवेढा मोठा तालुका आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होणार नाही यासाठी महसूल, पोलीस आणि आरोग्य विभागाने एकत्रित प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी टेस्टींग, ट्रेसिंग आणि ट्रीटमेंट त्रिसूत्रीचा प्रभावी वापर करावा. आरोग्य यंत्रणा प्रभावी करण्याबरोबरच स्थानिक खासगी वैद्यकीय व्यावसायिकांचीही मदत घेण्यात यावी. उपचार वेळेत होण्याबरोबरच आरोग्य यंत्रणा, महसूल यंत्रणा आणि पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांचे लसीकरण करावे. लसीकरण मोहीम यशस्वीरीत्या राबविण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
काँटेक्ट ट्रेसिंगचे प्रमाण वाढवा. एका रुग्णांच्या पाठीमागे किमान वीस लोकांचे ट्रेसिंग करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. नगरपरिषद आणि पंचायत समितीच्या यंत्रणांनी आपली जबाबदारी नीटपणे पार पाडावी. कामात कुचराई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, असेही त्यांनी सांगितले.
भगिरथ भालके यांनी विविध सूचना मांडल्या. उपविभागीय अधिकारी श्री. भोसले यांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महसूल प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी शिंदे, गटविकास अधिकारी चव्हाण यांनी त्यांच्या विभागाने केलेल्या तयारीची माहिती दिली.